TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून वाद; ठाण्यातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात रंगलेल्या वादाची शिंदे-फडणवीस सरकारमध्येही पुनरावृत्ती झाली आहे. ठाणे, पुणे, पालघरमधील बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आली. गृहविभागाने केलेल्या बदल्यांना पोलीस महासंचालकांनी स्थगिती दिल्याने सरकारमधील उच्चपदस्थांमधील मतभेद याला कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली.

गृहविभागाने सोमवारी पोलीस अधीक्षक व उपायुक्त संवर्गातील १००हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. संध्याकाळी या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले, पण त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली. राजकीय पातळीवरही सूत्रे हालू लागली. बदल्यांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासांतच आतापर्यंत नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने स्थगितीही दिली. यातील बहुतांश अधिकारी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील आहेत. 

ठाण्यातील परिमंडळ-४चे उपायुक्त प्रशांत मोहिते यांची ठाण्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांची नागपूरला झालेली बदली, ठाणे परिमंडळ-२चे उपायुक्त योगेश चव्हाण यांची नवी मुंबईत झालेली बदली, पालघरचे अप्पर अधीक्षक प्रकाश गायकडवाड यांची सोलापूरला झालेल्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. पुण्याच्या उपायुक्त नम्रता पाटील, फोर्स वनचे अधीक्षक संदीप डोईफोडे, राज्य सुरक्षा मंडळाचे समादेशक दीपक देवराज, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायु्क्त शर्मिष्ठा घार्गे यांच्याही बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत. गृहविभागाने काढलेल्या आदेशांना अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापन) संजीव कुमार सिंघल यांची एका आदेशान्वये या बदल्या वगळून अन्य अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यावरून शिंदे- फडणवीस सरकारमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे व पालघर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेला परिसर. या परिसरातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने गृहविभागाने या बदल्यांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पूर्वकल्पना दिली नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होतो. गृह खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोनदा बदल्यांना स्थगिती

  महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाण्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता ठाण्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादंग झाला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये गृहविभागाने ३९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये ठाण्यातील पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे, मीरा-भाईंदरमधील महेश पाटील आदी अधिकाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदल्या करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचे सांगत शिंदे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागत या बदल्यांवर अवघ्या काही तासांतच स्थगिती आणली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून अखेर ९ जून रोजी शिंदे यांची मागणी मान्य करीत या अधिकाऱ्यांना ठाण्यातच ठेवण्यात आले होते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुंबईतील १० उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button