TOP Newsताज्या घडामोडी

मुंबईच्या सुशोभीकरणासाठी ‘आकस्मिक निधी’ वळवला

मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आकस्मिक निधीला हात घातला आहे. या प्रकल्पासाठी १७०५ कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी २५० कोटींचा खर्च आकस्मिक निधीतून करण्यात येणार आहे. हा प्रकार ‘ऋण काढून सण साजरा’ करण्याचा आहे, अशी टीका पालिका प्रशासनावर होत आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या आराखडय़ाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्यानंतर महापालिकेने आता नियोजन सुरू केले आहे. पालिका निवडणुकीआधी हा प्रकल्प पूर्ण करून मतदारांना आकर्षित करण्याचा राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. निश्चित केलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करताना पालिकेची दमछाक होत असताना आता निधीची जुळवाजुळव करतानाही आकस्मिक निधी वळता करण्याची वेळ आली आहे.

सुशोभीकरणाच्या या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, दुरुस्त्या, हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना आदी कामे केली जाणार आहेत. डिसेंबपर्यंत किमान ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. १६ विविध प्रकारची कामे या सुशोभीकरणांतर्गत केली जाणार आहेत. त्यात सुविधा शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण अशी कामे केली जाणार आहेत.

या कामासाठी १७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी पुढील तीन महिन्यांसाठी ९०० कोटी तातडीने उपल्बध करून दिले जाणार आहेत. त्यापैकी ६५० कोटी हे विविध नागरी कामांसाठी केलेल्या तरतुदीतून वळते केले जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करताना ही तरतूद नगरसेवकांच्याप्रभागातील विकासकामांसाठी केली जाते. मात्र पालिका निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे हा निधी मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी वळता केला जाणार आहे. उर्वरित २५० कोटींचा निधी हा आकस्मिक निधीतून वापरला जाणार आहे.

वितरण असे..
हा प्रकल्प १७०५ कोटींचा आहे. त्यापैकी ९०० कोटी रुपयांचा निधी विभाग स्तरावर दिला जाणार आहे, तर रस्ते, पूल, उद्यान कक्ष अशा मध्यवर्ती यंत्रणा स्तरावर ७९० कोटींचा खर्च केला जाणार आहे. रस्त्यांच्या सुधारणेसाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे.

खर्च कशासाठी?
(आकडे कोटी रुपयांत)

पदपथ सुधारणा….६०
स्कायवॉकवर दिवाबत्ती ..४०
समुद्र किनाऱ्यांवर रोषणाई ..२५
उद्यानांचे सुशोभीकरण, दिवाबत्ती..१५
जाहिरातीसाठी डिजीटल फलक ..१०
किल्ल्यांची रोषणाई ..२५
गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण ..२०
मियावाकी वृक्षलागवड ..दोन कोटी
स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणे …१५
सुविधा शौचालयांची निर्मिती …..७८
एकूण : २९० कोटी

वापर की गैरवापर?
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आकस्मिक निधीतून वारंवार निधी घेण्यात आला होता.

गेल्या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला ७३२ कोटी रुपये होते. मात्र टप्प्याटप्प्याने ७०३ कोटी वळते केले गेले होते. नंतर केवळ २९ कोटी शिल्लक होते.

त्यामुळे अर्थसंकल्पातील भांडवली तरतुदीतून ३०० कोटी आकस्मिक निधीत जानेवारीत वळते करावे लागले होते.

मात्र आता त्यातील २५० कोटी सुशोभीकरणासाठी वापरले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button