पिंपरी / चिंचवड

जबाबदार नागरिक बनण्यासाठी संविधान समजून घेतले पाहिजे : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी l प्रतिनिधी

जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रत्येकाने संविधान वाचणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे. मुलं लहान असतानाच त्यांना संविधानाचे बाळकडू पाजल्यास ते अधिक शक्तिशाली, सामर्थ्यवान आणि जबाबदार नागरिक बनतील, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) पोलीस आयुक्तालयात शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांना संविधान आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, अजय जोगदंड, देवेंद्र चव्हाण, डॉ. संजय तुंगार आणि सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “देशातील प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून समजून घेतले पाहिजे. संविधानामुळे आपल्याला स्वतःचीच नव्याने ओळख होते. स्वतःसह  इतरांचे अधिकार, कर्तव्य माहिती झाल्याने नागरिक जबाबदारीने वागतात. संविधानाचा खरा पाईक असलेला नागरिक कधीही चुकीचे काम करणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने संविधान समजून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी दैनंदिन जीवनातील संविधानाचे महत्व समजावून सांगितले.

कार्यक्रमात ”विकास’ अनाथ आश्रमातील मुलांना संविधानाची प्रत, ब्लॅंकेट व चॉकलेटस देण्यात आली. दरवर्षीपेक्षा आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाल्याने अनाथ आश्रमातील बालचमूंच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघायला मिळत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button