ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

औद्योगिकनगरीला स्वच्छ सुंदर शहर बनविण्यासाठी कंपन्यांनी स्वच्छाग्रह मोहिमेत सहभागी व्हावे – महापौर ढोरे

पिंपरी चिंचवड | औद्योगीक नगरी ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असून इथल्या उद्योगधंद्यांचा या नगरीच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ सुंदर शहर बनविण्यासाठी शहरातील सर्व औद्योगिक कंपन्यांनी स्वच्छाग्रह मोहिमेत सहभाग घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी आणि महापालिका अधिका-यांकरीता स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आणि स्वच्छाग्रह जनजागृती कार्यशाळेचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना महापौर उषा ढोरे बोलत होत्या.

यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे सचिव दिपक करंदीकर, लघु उद्योग संघटनेचे संदिप बेलसरे, अभय भोर, फेडरेशन ऑफ असोसिएशनचे गोविंद पानसरे, पिंपरी चिंचवड प्लॅस्टीक असोसिएशनचे नितीन कोंढाळकर, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सहशहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच विविध इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, महापालिकेला आणि या शहराला उद्योगधंद्यांनी नावारुपाला आणले आहे. शहरातील विविध भागात या उद्योगामध्ये काम करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून स्वच्छाग्रह अभियानाला चालना मिळाल्यास या मोहिमेस व्यापक स्वरुप प्राप्त होईल. त्यामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि व्यावसायिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपला सक्रीय सहभाग घेऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा महापौर माई ढोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरु करुन स्वच्छाग्रह मोहिम प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. औद्योगिक भागातील निर्माण होणा-या कच-याच्या विलगीकरणाबाबत तसेच विल्हेवाट लावण्या संदर्भात कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. प्रदूषणयुक्त पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषणासोबतच पर्यावरणाचाही -हास होतो. पर्यायाने जीवसृष्टीला देखील धोका संभवतो. त्यामुळे अशा प्रकारच्या महत्वपूर्ण बाबींकडे कंपन्यांनी जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे.

यासाठी एसटीपी, सीईटीपी यासारखे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. औद्योगिक भागात ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर वाहिन्या टाकण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आवश्यकता भासल्यास एमआयडीसी, पीएमआरडीए अशा प्राधिकरणा समवेत बैठका घेवून औद्योगिक भागातील संलग्न प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या माध्यमातून शहराचा लूक बदलला जात असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे भर दिला जात आहे असे सांगून आयुक्त पाटील म्हणाले, या उपक्रमात कंपन्यांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असून निर्माण होणा-या कच-याचे विलगीकरण योग्य पध्दतीने झाल्यास कच-याची विल्हेवाट लावताना अडचणी उद्भवणार नाहीत. शिवाय महापालिका सफाई कर्मचा-यांना देखील कचरा वाहतुक करण्यासाठी सोईस्कर होईल.

घातक कच-याचे विघटन करण्यासाठी रांजणगाव येथे हा कचरा नेणे गरजेचे आहे. काही कंपन्यांकडून अशा कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट न लावण्यामुळे पर्यावरणाची हानी होते. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कटीबध्द असून कंपन्यांनी त्यांच्याकडील ओला व सुका कचरा तसेच घातक कचरा आणि जैव वैद्यकीय कचरा, सॅनिटरी वेस्ट असे कच-याचे वर्गीकरण करावे. याबाबत अनास्था दाखवू नये.

बेकायदेशीरपणे कच-याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार रोखणे आवश्यक असून नियमभंग करणा-यांविरूध्द पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला. स्वच्छाग्रह मोहिमेत कंपन्यांनी सहभाग घेऊन कंपनीतील परिसर स्वच्छ ठेवून सुशोभित करावा. औद्योगिक भागातील चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

संगणकीय सादरीकरणाद्वारे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी कार्यशाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान, स्वच्छाग्रह मोहीम तसेच कचरा वर्गीकरणाबाबत माहिती दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या उद्योजकांच्या सूचना आणि समस्यांबाबत यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button