breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात ‘ओमिक्रॉन’च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात; मुंबईसह महानगरांमध्ये ठरतोय वरचढ

मुंबई | प्रतिनिधी 
देशात दररोज अडीच ते तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना परिस्थितीवर नजर ठेवणाऱ्या केंद्राच्या इन्साकॉगने  याबद्दलची माहिती दिली आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यावर असून, मुंबई-दिल्लीसह इतर महानगरांमध्ये हा व्हेरियंट अधिक वरचढ ठरू लागला आहे. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा झपाट्याने वाढली आहे, असं निरीक्षण इन्साकॉगने नोंदवलं आहे.

इन्साकॉगने १० जानेवारीच्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणंच नाहीत किंवा सौम्य स्वरूपाची आहेत. सध्याच्या लाटेत रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या आणि आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे धोक्याची पातळी अद्याप कायम आहे, असं इन्साकॉगने म्हटलं आहे.

‘भारतात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली आहे आणि हा व्हेरियंट देशातील अनेक महानगरांमध्ये प्रबळ बनला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अलिकडेच B.1.640.2 कोरोनाशी संबंधित विषाणू दिसून आला आहे. मात्र, हा वेगाने पसरत असल्याचे वा इम्युनिटीला चकमा देत असल्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत,’ असंही इन्साकॉगकडून सांगण्यात आलं आहे.

इन्साकॉगच्या ३ जानेवारीच्या बुलेटिनमध्येही ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं आणि मुंबई-दिल्लीत त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं म्हटलेलं होतं. यापुढच्या काळात ओमिक्रॉनचा प्रसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे नव्हे, तर देशातंर्गतच होईल. व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असून, बदलल्या परिस्थितीनुसार जिनोम सिक्वेन्सिंगमधील उद्देशांवर इन्साकॉगकडून काम केलं जात असल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button