breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

डॉ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. प्रारंभी सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.

ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरूवात ८ वाजून ३० मिनिटांनी होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईलआणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती-१२४ व शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार आहे. मावळ मधील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी १६ टेबल लावण्यात येणार मावळसाठी २४ तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. तसेच पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ८ टेबल लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा     –      सर्वाधिक वाढदिवस १ जूनलाच का असतात? 

पुणे लोकसभाअंतर्गत वडगाव शेरी २२, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, कसबा पेठ प्रत्येकी १४, कोथरुड २० तर पर्वती विधानसभा मतदार संघ क्षेत्रासाठी १८ टेबलवर मतमोजणी होणार असून पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १० टेबलची व्यवस्था असेल. वडगाव शेरी २१, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, कसबा पेठ व पुणे कॅन्टोंमेंटसाठी प्रत्येकी २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड मतदारसंघासाठी १४ टेबल व २३ फेऱ्या, इंदापूर १६ टेबल व २१ फेऱ्या, बारामती १८ टेबल व २२ फेऱ्या, पुरंदर २० टेबल व २२ फेऱ्या, भोर २४ टेबल व २४ फेऱ्या तर खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी २२ टेबल व २४ फेऱ्या होतील.

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर मतदारसंघासाठी १४ टेबल व २५ फेऱ्या, आंबेगाव १४ टेबल व २४ फेऱ्या, खेड-आळंदी १६ टेबल व २४ फेऱ्या, शिरुर १६ टेबल व २७ फेऱ्या, भोसरी २० टेबल व २३ फेऱ्या तर हडपसर विधानसभा मतदार संघासाठी २० टेबल व २६ फेऱ्या होतील. पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १२ टेबल लावण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण ६५६ मतमोजणी सहायक, ६०० मतमोजणी पर्यवेक्षक आणि ६४० सूक्ष्म निरीक्षक असे एकूण १ हजार ८९६ मनुष्यबळ तर टपाली व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ४७ मतमोजणी पर्यवेक्षक, ६९ मतमोजणी सहायक आणि ५८ सूक्ष्म निरीक्षक असे १७४ याप्रमाणे एकूण २ हजार ७० मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाच्या ईव्हीएम मतमोजणीसाठी १६२ मतमोजणी सहायक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १५८ सूक्ष्म निरीक्षक, पुणे लोकसभेसाठी १६८ मतमोजणी सहायक, १५९ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १६३ सूक्ष्म निरीक्षक, बारामतीसाठी १६४ मतमोजणी सहायक, १५२ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १५३ सूक्ष्म निरीक्षक, शिरुरसाठी १६२ मतमोजणी सहायक, १५२ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १६६ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी मावळ लोकसभा मतदार संघात १४ मतमोजणी सहायक, ७ मतमोजणी पर्यवेक्षक आणि ८ सूक्ष्म निरीक्षक, पुणे लोकसभेसाठी १९ मतमोजणी सहायक, १२ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १४ सूक्ष्म निरीक्षक, बारामतीसाठी २० मतमोजणी सहायक, १० मतमोजणी पर्यवेक्षक आणि १८ सूक्ष्म निरीक्षक तर शिरुर लोकसभा मतदार संघासाठी १६ मतमोजणी सहायक, प्रत्येकी १८ मतमोजणी पर्यवेक्षक आणि सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

वाहनतळ व्यवस्था

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी येणारे मनुष्यबळ व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं.७, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमतेचे दुचाकी व चारचाकी वाहनतळ तर द पूना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी ८०० ते ९०० वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय सदर दिवशी वाहतुकीला अडथळा येऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. मतमोजणीसाठी येणाऱ्या सर्व घटकांना कोणतीही असुविधा होणार नाही यासाठी निवडणूक प्रशासन सर्व ती काळजी घेत असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button