breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठराव; ‘घड्याळ’ वरच निवडणूक लढवा!

शहर पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक, उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा

सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे. चिंचवड मतदार संघातून राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी आणि या मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी सोडू नये, असा ठराव शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला आहे. 

पिंपरी-चिंचवड संपूर्ण शहरात कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि नेतेमंडळी देखील आक्रमक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘एक्शन मोड’मध्ये असल्याने, ही निवडणूक घड्याळ याच चिन्हावर लढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वास्तविक, चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि भाजपाची ताकद तुल्यबळ आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाले आहेत. विद्यमान खासदार शिंदे गटात असून, चिंचवडमधील ठाकरे गटाची ताकद तुलनेत कमी आहे. परिणामी, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शिवसेना (ठाकरे गट) तुलनेत जास्त आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावी आणि संबंधित उमेदवार राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पक्ष कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महारष्ट्र राष्ट्रवादी विध्यार्थी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी  विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, जेष्ठ नगरसवेक भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, माजी नगरसवेक मयुर कलाटे, विनोद नढे, पंकज भालेकर, नगरसेवक राजेंद्र जगताप, अरूण बोऱ्हाडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, राजु लोखंडे, विनायक रनसुबे, फझल शेख, नारायण बहिरवडे, माजी नगरसेविका माया बारणे, संगिता ताम्हाणे, राष्ट्रावादी युवती अध्यक्ष वर्षा जगताप , क्रिडा सेल अध्यक्ष समिधा गोरे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे आदी उपस्थित होते.

कोण काय म्हणाले.? 

अजित गव्हाणे, शहराध्‍यक्ष : 

ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे. तसेच, आपले पक्ष संघटन मजबूत असून बूथस्तरीय तयारी झाली आहे. शहरात ‘आरएसएस’चे प्राबल्य वाढत असल्याने या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक : 

एक महीना आपल्याला घरी जायचे नाही आणि विजयश्री खेचून आणायची आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही. 

नाना काटे, माजी विरोधी पक्षनेता : 

महापालिका जिंकण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून, चिंचवडमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणे गरजेचे आहे. 

राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक : 

मागच्या १० वर्षात राष्ट्रवादीचा आणि अजितदादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. आता पक्षाने देखील कुणाचा विचार करायची गरज नाही.

…असा आहे पक्ष संघटनेचा प्रस्ताव 

शहारातील चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक २०२३ जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खालील सर्व पदाधिकारी पक्ष कार्यालयात जमलेले आहोत. महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष जे सत्तेचं नाट्य सुरू आहे, यामध्ये पुरुगोमी विचाराच्या पक्षांचं, पुरोगामी संघटनांचे आणि कार्यकत्यांचे दमन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न या शहरात हाणून पाडण्यासाठी ही निवडणूक आपल्याला ही एक सुवर्णसंधी आलेली आहे. आपली एकजूट दाखवून नव्या विजयाची नांदी सुरू करण्याची संधी म्हणून याकडे आपण बघायला हवे.

आपला चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. इथे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय अण्णासाहेब मगर, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय रामकृष्ण मोरे सर, आदरणीय अजितदादा पवार यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पिंपरी चिंचवड शहराचा विकास घडवून आणलेला आहे. इथला बहुसंख्य मतदार हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार आणि आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांचे नेतृत्व मानणारा आहे.

दुर्दैवाने काही अपरिहार्य राजकीय कारणांमुळे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपल्याला पराभूत व्हावे लागले. मागील वेळेस, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण बाहेरील उमेदवारास पाठिंबा दिला होता. पण राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच भाजपचे आक्रमक राजकारण पाहता आपण आपला हक्काचा मतदारसंघ कुठल्याही भावनिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेसाठी इतर पक्षांसाठी सोडू नये. येत्या वर्षभरात महापालिका आणि लोकसभा अशा दोन मोठ्या निवडणुका पार पडणार आहेत, यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही जागा राष्ट्रवादीने लढवायला हवी, अशी कार्यकर्त्यांची आणि आमची भावना आहे.

पक्ष आणि संघटना म्हणून महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत फॅसिस्ट आणि धर्मवादी राजकारणाचे वादळ घोंगावत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरोगामित्वाची पताका कायम हातात ठेवून चाललेली आहे. आदरणीय फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे.  या पार्श्वभूमीवर आम्ही खालील प्रस्ताव आपणासमोर ठेवत आहोत.

1. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढवावी.

2. ही जागा लढताना ती फक्त आणि फक्त घड्याळ ह्या चिन्हावरच लढवावी.

3. उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेलाच असावा.

 कारण मागील पाच वर्षांमध्ये पक्षाची खूप पडझड झाली आहे. या पडझडीमध्ये सुद्धा पक्षाचे काम करण्यासाठी आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि पुरोगामी विचार यांवर निष्ठा ठेऊन अत्यंत प्रतिकूल काळात पक्षासोबत जी लोक राहिली त्यातील व्यक्तीचा योग्य विचार व्हावा.

निष्ठेचा आणि नियोजनपूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. जेणेकरून पक्षसंघटनेचा योग्य संदेश तळागाळापर्यंत जाईल. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. म्हणून वरील प्रस्तावावर गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. शेवटी आपण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घ्याल तो आम्हाला शिरसावंद्य आहेच.

सदर प्रस्ताव राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, दोन-तीन दिवसांत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असा दावा केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button