क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुंबईविरुध्द चेन्नईच ठरले ‘सुपर किंग्ज’; ऋतुराज गायकवाड ठरला विजयी शिल्पकार

पिंपरी चिंचवड | सुमारे चार महिन्यांहुन अधिक काळानंतर दुबईत पुन्हा सुरू झालेल्या आयपीएलच्या 31 व्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्स संघावर 20 धावांनी बळी मिळवत आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली, तथापी अनपेक्षितपणे विजयाला गवसणी घालत चेन्नईने आपले स्थान आणखी मजबूत केले.आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी पण त्यांची सुरुवात मात्र अजिबातच चांगली झाली नाही, फ्लासिस पहिल्याच षटकात बाद झाला,तर धोनी ,रैना आणि मोईन अली असे खंदे फलंदाज संघाची धावसंख्या 25 सुद्धा नसताना एकापाठोपाठ एक बाद झाले.

दरम्यान, अंबाती रायडु सुद्धा जायबंदी झाला अन चेन्नई संघ एकदमच अडचणीत आला असे वाटत असतानाच पुणेकर ऋतुराज गायकवाडने प्रथम जडेजा आणि नंतर ब्रावोला सोबत घेत अप्रतिम फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देत केवळ 58 चेंडुतच नाबाद 88 धावा करताना 9 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले आणि संघाला 156 धावांची बऱ्यापैकी चांगली धावसंख्या गाठून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मुंबई कडून बुमराह, बोल्ट आणि मिलनने दोन दोन बळी मिळवले.

उत्तरादाखल 157 धावांचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा,आणि हार्दिक पंड्याच्या अनुपस्थित खेळताना डिकोक आणि अनमोलप्रीत सिंग ही सलामी जोडी उतरवून दोघांनीही बऱ्यापैकी सुरुवात केली खरी पण ती विजयासाठी पुरेशी नव्हती, दीपक चाहरने उत्तम गोलंदाजी करताना सलामी जोडी वापस पाठवली तर नवीन भारतीय सेंसेशन म्हणवला जाणारा सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन सुद्धा विशेष काहीही कामगिरी न करताचा बाद झाले.

मुंबई इंडियन्सची अवस्था आणखीनच कठीण झाली, मात्र कर्णधार आणि 20/20चा बादशहा पोलार्ड बाकी असल्याने मुंबई इंडियन्सला विजयाची आशा होती मात्र हेजलवूडने पोलार्डला केवळ 15 धावांवर पायचीत करून मोठा धक्का दिला ज्यातून मुंबई इंडियन्स संघ सावरला नाही तो नाहीच.

दरम्यान, कृनाल पंड्या आत्मघाती चोरटी धाव काढण्याच्या नादात धावबाद झाला,आणि उरलेसुरले काम ब्रावोने पूर्ण करत शेवटच्या षटकात किफायती गोलंदाजी करताना दोन बळी मिळवत अखेरचा घाव घातला आणि आपल्या संघाला 20 धावांचा मोठा विजय मिळवून दिला.

या अटीतटीच्या संपुर्ण खेळीत धोनीचे कल्पक आणि अनुभवी नेतृत्व पुन्हा एकदा भारी ठरले आणि मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरून खाली सरकली. मुंबई इंडियन्सची आत्मघाती फलंदाजी सुद्धा धोनी आणि टीमच्या विजयाला हातभार लावणारी ठरली.सौरभ तिवारीने नाबाद अर्धशतक केले खरे पण ते वांझोटेच ठरले. कठीण परिस्थितीत उत्तम खेळी करणारा मात्र युवा ऋतुराज गायकवाड आज सामनावीर ठरला.

एकीकडे गणपत्ती बाप्पाला द्यावा लागणाऱ्या निरोपामुळे काहीसे दुःखी झालेल्या अनेक भारतीय क्रिकेट रसिकांचे आजच्या सामन्याने काही प्रमाणात तरी ते दुःख कमी केले असे म्हणता येईल,या विजयाने चेन्नई सुपर किंग्जने आपली गुणसंख्या बारा करून अंकतालिकेतले आपले स्थान आणखीन बळकट केलेले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button