breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवाळी फराळाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांची गप्पांची मैफल

दिशा सोशल फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाचे आयोजन

पिंपरी : नेहमीचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण बाजूला ठेवून राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शनिवारी (११ नोव्हेंबर) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास तीन तास गप्पांची मैफल रंगली.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने यंदा आठव्या वर्षी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. काळेवाडी येथील आरंभ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अभिनेते प्रवीण तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री बाळा भेगडे आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार दिपक पायगुडे, अभिनेते प्रविण तरडे, देवदत्त नागे, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, वसंत लोंढे, सचिन साठे, राहुल कलाटे, योगेश बाबर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, सुरेश भोईर आदींनी हजेरी लावली.

यावेळी आयर्नमॅन स्वप्निल चिंचवडे, शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आर्या म्हस्के यांना दिशागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा झाली.

दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, सचिव संतोष निंबाळकर, खजिनदार नंदकुमार कांबळे, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आदींसह दिशा सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी संयोजन केले.

कोण काय म्हणाले?

प्रवीण तरडे : सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर आणून सांस्कृतिक विचारांची दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम दिशाने सातत्याने राबविला आहे. मी ही या संस्थेचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो.

देवदत्त नागे : दिवाळीचा सण हा प्रकाशाचा उत्सव आहे. स्नेह, आपुलकी आणि एकात्मता जपणारा उत्सव आहे. दिवाळी फराळाच्या निमित्ताने आपल्यातील स्नेह आणि आपुलकी अधिक वाढावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शहरात राबविले पाहिजेत.

खासदार श्रीरंग बारणे : प्रत्येक जण प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करत असतो, परंतु दिशा ही संस्था याला अपवाद आहे. एकाच व्यासपीठावर सर्वांना एकत्र आणून दिवाळीचा गोडवा अधिक वाढवण्याचा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा दृष्टिकोन जपला पाहिजे, असा संदेश दिशा नेहमीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने देत असते.

आमदार आण्णा बनसोडे : समाजकारण, राजकारण आणि प्रशासनातील व्यक्तींचे स्नेहबंध अधिक घट्ट करण्याचे काम या दिवाळी फराळाच्या निमित्ताने घडत आहे.

शंकर जगताप : दिवाळी फराळाच्या निमित्ताने आपली संस्कृती जतन करण्याची व वैचारिक मेजवानी देण्याची परंपरा दिशाने कायम राखली आहे.

भाऊसाहेब भोईर : पदे येतात आणि पदे जातात, परंतु पदाच्या पलीकडे जाऊन मित्रत्वाचे एक नाते असते, ते जपावे आणि अधिक वाढवावे असे काम राजकीय व्यक्तींना शिकवणारी, दिशा देणारी शहरातील ही एक अनोखी संस्था आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button