breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला अन्यथा ‘हक्कभंग’; आमदार उमा खापरे यांचा इशारा

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करीत असताना राजकीय हस्तक्षेप झाला असून, निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केला आहे. त्यामुळे मतदारांना हरकती व सचूना दाखल करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी. तसेच, मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी, अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात आयुक्त राजेश पाटील, निवडणूक विभागाचे अधिकारी जितेंद्र वाघ आणि बाळासाहेब खांडेकर यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे, असा इशारा विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२२ साठी निवडणूक विभागाने प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून २०२२ रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार दि. १७ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु, आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या दि. २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावर दि. १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे प्रशासनाचे सूचित केले आहे. तसेच, प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. ९ जुलै२०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याचा अर्थ निवडणूक विभाग हरकीत आणि सूचना दाखल करण्यासाठी केवळ ८ दिवसांचा वेळ देत आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. याबाबत मतदारांमध्ये अगोदरच संभ्रम आहे. मतदार याद्या फोडताना प्रशासनाने प्रभागाच्या सीमांचा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील मतदार याद्यांबाबत हरकती असल्याचे दिसत आहे, असेही खापरे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे विधान परिषदेची सदस्या या नात्याने पिंपरी-चिंचवडमधील मतदार याद्यांमध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप आणि नियमबाह्यपणे केलेली उलथापालथ याबाबत कार्यवाही न केल्यास आणि मुदतवाढ न देता मतदारांच्या हक्कांवर गदा आणण्यांचा प्रयत्न केल्यास आगामी विधिमंडळ अधिवेशनामध्ये निवडणूक विभागाचे अधिकारी श्री. राजेंद्र वाघ आणि श्री. बाळासाहेब खांडेकर यांच्यासह प्रशासन प्रमुख म्हणून आपल्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशाराही आमदार खापरे यांनी दिला आहे.
राजकीय हस्तक्षेप विरहीत निवडणूक व्हावी : खापरे
निवडणूक विभागाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप झाल्याबाबत सर्वच पक्षाच्या इच्छुकांच्या हरतकी असल्यामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्याबाबत दिलेली दि. १ जुलै २०२२ पर्यंतची मुदत अल्प आहे. राजकीय हस्तक्षेप विरहीत निवडणूक पार पडावी. मतदारांना सोयीच्या मतदान केंद्रावर मतदार करता आले पाहिजे. निवडणूक विभाग विशिष्ट लोकांच्या सांगण्यावरुन काम करीत असले, तर लोकशाहीला मारक होईल, अशी आमची भूमिका आहे. परिणामी, निवडणूक विभाग आणि प्रशासनाने मतदार यादींवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही आमदार उमा खापरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button