TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला दूरध्वनी करणे पडले महागात

मुंबईः बँक खात्यातील रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राला दूरध्वनी करणे ५८ वर्षांच्या महिलेला भलतेच महागात पडले. बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींनी महिलेच्या दोन बँक खात्यातून सुमारे साडेअकरा लाख रुपये काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार महिला अंधेरीतील लोखंडवाला परिसरात तिच्या वयोवृद्ध पतीसह राहते. तिला एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो तर मुलगी डॉक्टर असून ती सध्या जमैका येथे राहते. ते दोघेही त्यांच्या मुलीकडे राहत असून दोन ते तीन वर्षांतून एकदा मुंबईत येतात. ११ नोव्हेंबरला तक्रारदार महिलेला तिच्या एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात काही रक्कम हस्तांतरीत करायची होती, मात्र प्रक्रिया करुनही व्यवहार पूर्ण होत नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलने गुगलवरुन बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा दूरध्वनी क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला एक मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीने तो बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून तिला एकर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

तिने ते अॅप डाऊनलोड करुन तिच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यावेळी तिच्या बँक खात्यातून दहा लाख पत्तीस हजार रुपये हस्तांतरीत झाले. याबाबत तिने विचारणा केली असता ही रक्कम तिच्या खात्यात पुन्हा जमा होईल, तुम्ही काळजी करु नका असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्याकडून दुसर्‍या बँक खात्याची माहिती घेऊन त्या खात्यातून सहा ऑनलाईन व्यवहार करुन १ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केला. अशा प्रकारे बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करुन या सायबर ठगाने तिच्या दोन बँक खात्यातून सुमारे साडेअकरा लाख रुपये काढले व तक्रारदार महिलेची फसवणुक केली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने संबंधीत अॅप बंद करुन सायबर सेल पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोमवारी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button