लासलगावच्या बाजारपेठेत २७ दिवसांत ११.७०लाख क्विंटल विक्रमी कांदा आवक
नाशिक – आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २७ दिवसात कांद्याची ११ लाख ७० हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली आहे. यातून बाजारपेठेत तब्बल १८० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी १२ मे २०२१ ते २३ मे २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर २४ मे २०२१ पासुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. २४ मे २०२१ ते २१ जुन २०२१ ह्या कालावधीत लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर ११ लाख ७० हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.तरी सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असुन शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे.





