इराण आणि इस्रायलमधील युद्ध पेटले
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा फटका भारताला बसणार

महाराष्ट्र : इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी पेटले आहे. आता अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली आहे. त्यामुळे युद्ध संपण्याची शक्यता कमी झाली आहे. जर हे युद्ध आणखी लांबले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम भारताच्या पश्चिम आशियातील देशांसोबतच्या व्यापारावर होणार आहे. यामध्ये इराण, इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. कारण या देशांमध्ये भारताची एकूण निर्यात 8.6 अब्ज डॉलर आणि आयात 33.1 अब्ज डॉलर आहे. याचा भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
व्यापारावर परिणाम होणार
भारताच्या व्यापाराबाबत बोलताना, मुंबईतील निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक शरद कुमार सराफ यांनी म्हटले की, ‘या युद्धाचा भारताच्या व्यापारावर गंभीर परिणाम होईल. आता आमच्या कंपनीने इराण आणि इस्रायलला पाठवला जाणारा माल देखील थांबवला आहे. याचा मोठा फटका देशाला बसणार आहे.’
भारताकडून इराण आणि इस्रायलला काय पाठवले जाते?
भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात इराणला एकूण 1.24 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, ज्यामध्ये बासमती तांदूळ (753.2 दशलक्ष डॉलर), केळी, सोयाबीन पेंड, हरभरा आणि चहा यासारख्या कृषी उत्पादनांचा समावेश होता. तसेच भारताने इराणमधून 441.8 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. तसेच भारताने इस्रायलसोबत 2.1 अब्ज डॉलर्सची निर्यात आणि 1.6 अब्ज डॉलर्सची आयात केली. सध्या हे दोन्ही देश संकटात आहेत. त्यामुळे भारताच्या व्यापारावर आणखी परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा – ‘शेजारी देश सरळ वागतीलच असे गृहित धरु नये’; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्य
इराणची धमकी
होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गातून भारताला 60-65 % कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. मात्र इराणने हा जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. ही सामुद्रधुनी इराण आणि ओमान/संयुक्त अरब अमिराती दरम्यान आहे. याद्वारे सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत आणि कतारमधून तेल आणि एलएनजी निर्यात केले जाते. मात्र हा मार्ग बंद झाल्यास भारतात इंधन महाग होईल, महागाई वाढेल, रुपयावर दबाव येईल, ज्यामुळे देशाचे आर्थिक संतुलन बिघडू शकते.
व्यापार अडचणीत
मिळालेल्या माहितीनुसार हूथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे लाल समुद्र मार्गावर परिणाम झालेला आहे. याचा फटका भारत-युरोप आणि भारत-अमेरिका यांच्यातील व्यापाराला बसला आहे. भारताचा 80 % युरोपीय व्यापार आणि एकूण निर्यातीपैकी 34% या समुद्री मार्गांमधून होतो.
भारतासमोर कोणती आव्हाने
भारताचे इराणशी ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. तसेच भारताचे अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांसोबतही मजबूत संबंध आहेत. मात्र हे सर्व देश युद्धात सामील झाल्यामुळे, भारताच्या व्यापाराची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भारताला फटका बसण्याची शक्यता आहे.