नोव्हेंबरपासून बँकिंगमध्ये नॉमिनी पद्धतीत महत्त्वाचा बदल, वाचा काय आहेत नवे नियम…

पुणे : नोव्हेंबर महिना बँक ग्राहकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, 1 नोव्हेंबर 2025 पासून बँकिंग प्रणालीत ग्राहकांना त्यांच्या खात्यात चार नॉमिनी जोडण्याची सुविधा लागू होत आहे. यामुळे बँकिंग व्यवस्थेत दाव्यांचे निराकरण अधिक पारदर्शक, सोपे आणि प्रभावी होईल.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, 2025 अंतर्गत बँक खात्यांमध्ये नॉमिनीशी संबंधित प्रमुख तरतुदी लागू होतील. हा कायदा 15 एप्रिल 2025 रोजी अधिसूचित झाला होता. या सुधारणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934; बँकिंग नियमन कायदा, 1949; स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, 1955 आणि बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व हस्तांतरण) कायदा, 1970 व 1980 यासह पाच कायद्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. एकूण 19 सुधारणा या कायद्यांअंतर्गत करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदल? ‘या’ मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’
सुधारणांनुसार, बँक ग्राहक आता एका खात्यात एकाच वेळी किंवा अनुक्रमे चार व्यक्तींना नॉमिनी करू शकतात. प्रत्येक नॉमिनीचा वाटा किंवा हक्काची टक्केवारी ठरवता येईल, ज्यामुळे एकूण रक्कम 100 टक्के सुनिश्चित होईल आणि संभाव्य वाद टळतील.
बँकिंग प्रणालीतील महत्त्वाचा बदल म्हणजे नॉमिनी जोडण्याची पद्धत. आता ग्राहक फक्त एक किंवा दोन नव्हे तर चार नॉमिनी जोडू शकतात. ठेवीदार चार नॉमिनी व्यक्ती एकाच वेळी निवडू शकतात आणि प्रत्येकासाठी वाटा निश्चित करू शकतात. तसेच, सलग नॉमिनी पद्धतीत पुढील नॉमिनी व्यक्ती फक्त उच्च श्रेणीतील नॉमिनीच्या मृत्यूनंतरच प्रभावी होतील, ज्यामुळे सेटलमेंटमध्ये सातत्य आणि उत्तराधिकार स्पष्ट राहील.




