दुबई-मुंबई प्रवासासाठी सोन्याचा भाव! १८ हजारांचे तिकीट ८० हजारांवर; युद्धाच्या छायेत भारतीयांची लूट?

नाशिक : इराण आणि इस्त्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षाची झळ मध्य-पूर्व आणि आखाती देशांनाही बसल्याने वेगवेगळ्या देशात अडकलेले विद्यार्थी, पर्यटकामुळे भारतातील त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुबईमध्ये पर्यटनाबरोबर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे. युद्धजन्य स्थितीत काही कंपन्यांच्या विमानसेवा सुरू झाल्या असून त्यासाठी आकारले जाणारे दर थक्क करणारे आहेत. दुबईहून परतलेल्या आणि परतणाऱ्यांना तशीच अनुभूती येत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी अधिक पैसे मोजण्यापेक्षा दुबईत थांबणे पसंत केले. तर, काहींनी उशिराने तिकीट काढून भारतात येण्याचे नियोजन केले आहे.
इराणने आखाती देशांनाही लक्ष्य केल्याने अनेक भागातील विमानसेवा ठप्प झाली. युद्धजन्य स्थितीत वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नाशिक जिल्ह्यातील नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाने संकलित केली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही संख्या २६० हून अधिकवर पोहचली. संबंधितांना सुरक्षित भारतात आणण्याची तयारी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रगतीपथावर आहे. इराणने दुबईत हल्ले केल्यानंतर तीन, चार दिवस बंद राहिलेली विमानसेवा हळूहळू सुरू होत आहे. युद्धाच्या सावटातून बाहेर पडण्याची बहुतेकांची मानसिकता असून याचा लाभ विमान कंपन्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.
दुबईतील डिमोंट विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारा लासलगाव येथील अर्जुन होळकर हा अमिरात एअरलाईन्सच्या विमानाने परतला. एरवी दुबई-मुंबई प्रवासासाठी १८ ते २२ हजार रुपये लागतात. परंतु, सद्यस्थितीत त्याला चारपट अधिक रक्कम तिकीटासाठी मोजावी लागली. दुबईतील वोलोंगोंग विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या नाशिक येथील अर्णव कुशारे यालाही तसाच अनुभव आला. शुक्रवारसाठी त्याने विमानाची तिकीट नोंदणी केली. त्याला ७० ते ८० हजार रुपये मोजावे लागले. युद्धात पुढे काय होणार, हे अस्पष्ट आहे. त्यामुळे धोका न पत्करता मायदेशी परतणे कधीही योग्य, असे त्याचे म्हणणे आहे.
हेही वाचा – ‘अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वोलोंगोंग विद्यापीठात नाशिकचा प्रेम देवरे हा विद्यार्थी शिक्षण घेतो. परंतु, तो भारतात येणार नाही. सध्या तो दुबईत थांबणार आहे. दुबईत परिस्थिती शांत आहे. विद्यापीठाने ऑनलाईन शैक्षणिक कामकाज सुरू केले असून शैक्षणिक प्रकल्प अर्थात प्रोजेक्ट सादर करावयाचे आहेत. वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांमुळे पालक वर्गात घबराट पसरली. पालकांच्या आग्रहामुळे अनेक विद्यार्थी घरी परतत आहेत. सद्यस्थितीत दुबईतून मुंबईला जाण्यासाठी सर्वच विमान कंपन्यांची तिकीटे ५० हजारहून अधिक असल्याचे भारतात परतणाऱ्या मित्रांनी सांगितल्याचे प्रेम देवरे याने नमूद केले.
नाशिकमध्ये् चार्टर्ड अकौंटंट्सचे शिक्षण घेणारी युवती दोन आठवड्यांच्या दुबई सहलीसाठी गेली होती. पहिला आठवडा झाल्यानंतर तिथे युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे तिला हॉटेलबाहेर पडता आले नाही. आकाशात अधुनमधून क्षेपणास्त्रांचे आवाज आले. परंतु, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समजली. आधीच्या नियोजनानुसार तिकीट रद्द होऊन नव्या वेळापत्रकानुसार आखणी झाली. त्यामुळे तोपर्यंत दुबईत थांबावे लागणार असल्याचे तिने सांगितले. ज्यांना दुबईतून तत्काळ भारतात परतायचे आहे, त्यांना तिकीटासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याचे ती म्हणाली.





