गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा! SBI ने कमी केले कर्ज व्याजदर, नवीन दर जाणून घ्या

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.50% (50 बेसिस पॉइंट) कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्ज व्याजदरात 0.50% पर्यंत घट केली आहे. 15 जून 2025 पासून लागू होणाऱ्या नव्या दरांमुळे गृहकर्जासह इतर कर्जे स्वस्त होणार आहेत. यामुळे कर्जदारांच्या मासिक हप्त्यांवर (EMI) दिलासा मिळेल.
SBI ने आपला एक्सटर्नल बेंचमार्क रेट (EBR) 8.65% वरून 8.15% केला आहे. सध्याचा रेपो रेट 5.5% असून, त्यावर 2.65% स्प्रेड जोडून EBR निश्चित केला जातो. यावर आधारित गृहकर्ज, MSME कर्ज यांचे व्याजदर ठरतात. नव्या दरांनुसार, SBI चे गृहकर्ज व्याजदर 7.50% ते 8.45% असतील, जे सिबिल स्कोअर, कर्जाची रक्कम आणि मुदतीवर अवलंबून आहेत. मॅक्सगेन ओव्हरड्राफ्ट कर्जासाठी 7.75% ते 8.70% आणि टॉप-अप कर्जासाठी 8.00% ते 10.50% व्याजदर लागू आहेत. गृहकर्जाची प्रक्रिया फी कर्ज रकमेच्या 0.35% आहे, जी किमान 2,000 आणि कमाल 10,000 रुपये (GST वेगळा) आहे.
हेही वाचा – दक्षिण अफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चोकर्सचा डाग पुसला
MCLR मध्ये 14 जून 2025 पर्यंत कोणताही बदल नाही. ओव्हरनाइट आणि 1 महिन्यासाठी 8.20%, 3 महिन्यांसाठी 8.55%, 6 महिन्यांसाठी 8.90%, 1 वर्षासाठी 9.00%, 2 वर्षांसाठी 9.05% आणि 3 वर्षांसाठी 9.10% MCLR आहे. सिबिल स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो, जिथे 700 पेक्षा जास्त स्कोअर चांगला आणि 800 पेक्षा जास्त उत्कृष्ट मानला जातो. यामुळे कर्ज मिळवणे सोपे आणि स्वस्त होते.
ही व्याजदर कपात कर्जदारांना, विशेषतः गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा देईल. नवीन दरांमुळे कर्ज परवडणारे होऊन मासिक हप्ते कमी होतील, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना फायदा होईल.