टाटांच्या सुपर अॅपमध्ये 1.80 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते वॉलमार्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Tata-super-app.jpg)
रिटेल बाजारावरील आपली पकड घट करत आपले स्थान भक्कम करण्यासाठी आता टाटा समूहानेदेखील रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. मिठापासून साॅफ्टवेअरपर्यंत उलाढाल करणारा टाटा समूह ‘सुपर अॅप’आणण्याची तयारी करीत आहे. एवढेच नाही तर यामध्ये वाॅलमार्ट ही अमेरिकेतील हाेलसेल कंपनी १.८ लाख काेटी रुपयांची गुंतवणूक करून माेठा हिस्सा खरेदी करू शकते. या सुपर अॅपसाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने टाटा समूह अनेक संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुपर अॅपमधील हिस्सा मिळवण्यासाठी वाॅलमार्ट इंकबराेबर टाटाच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि वाॅलमार्ट १.४ ते १.८ लाख काेटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. जर टाटा समूह आणि वाॅलमार्ट यांच्यात भागीदारी झाली तर ताे देशातल्या रिटेल क्षेेत्रातील सर्वात माेठा व्यवहार ठरणार आहे.
वाॅलमार्टने मे २०१८ मध्ये फ्लिपकार्ट या ई-काॅमर्स कंपनीचा ६६ % भांडवली हिस्सा खरेदी केला हाेता. हा व्यवहार जवळपास १.१८ लाख काेटी रुपयांत झाला हाेता. व या भागीदारीनंतर टाटा समूह व वाॅलमार्ट एका संयुक्त सहकार्यातून सुपर अॅप बाजारात आणू शकते. टाटा समूह, फ्लिपकार्टच्या ई-काॅमर्स व्यवसायाला यातून फायदा हाेऊ शकेल. या माध्यमातून टाटा व फ्लिपकार्ट उत्पादने ग्राहकांना एकाच मंचावर उपलब्ध हाेतील. वाॅलमार्टने या व्यवहारासाठी गाेल्डमन सॅक्सला इन्व्हेस्टमेंट बँकरच्या स्वरूपात नियुक्त केले आहे.