TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दादर स्थानक परिसरातील रस्त्यांची ब्रशने सफाई

दादर म्हटले की डोळ्यासमोर येते ती प्रचंड गर्दी, भाजीवाले, फेरीवाले यांनी व्यापलेले रस्ते आणि रस्त्यांवर पडलेल्या भाजीचा चिखल. हे चित्र बदलण्याचा संकल्प पालिकेच्या विभाग कार्यालयाने केला असून दिवाळीनंतर पालिकेने फेरीवाल्यांच्याविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. त्याचबरोबर दादरमधील रस्ते, विशेषतः स्थानक परिसर आणि प्लाझा चित्रपटगृहाजवळचे रस्ते ब्रशने साफ करून, पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करण्याचे विभाग कार्यालयाने ठरवले आहे. दर आठवड्याला ही स्वच्छता करण्यात येणार आहे.

दादर स्थानक परिसर हा भाजी आणि फूल विक्रेत्यांची मोठी बाजारपेठ आहे. रोज पहाटे याठिकाणी मुंबई बाहेरून घाऊक प्रमाणावर भाज्या आणि फुले आणली जातात. लहान व्यापारी हा माल विकत घेतात आणि ठिकठिकाणी नेऊन विकतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून त्याचा ताण दादर परिसरावर येऊ लागला आहे. भाज्यांच्या गोण्या उतरवताना पडलेल्या भाज्या, माती यामुळे स्थानकाजवळचे रस्ते विशेषतः टिळक पूलाच्या पदपथावर चिखलाचे जाड थर साठतात. त्यावर उपाय म्हणून पालिकेने दिवाळीनंतर फेरीवाल्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. दादर परिसराला फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. मात्र पालिकेची मोहीम थंडावली की पुन्हा फेरीवाल्यांची गर्दी तशीच पूर्ववत होते. मात्र हे चित्र बदलण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.

रोज, सातत्याने रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम केले जातेच. मात्र दादर परिसरातील कचऱ्याचे प्रमाण प्रचंड असून दिवाळीदरम्यान व आताही दर तासाने कचरा उचलला जातो. दिवाळीनंतर आता अतिक्रमण निर्मूलन विभागाने फेरीवाल्यांविरोधात मोहीम कडक केली आहे. त्याला जोड देत आम्ही रस्ते स्वच्छ करण्यासाठी यंत्राचा वापर करीत आहोत. दिवाळीत रोज वॉटर जेट अर्थात पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने आणि ब्रशने स्थानक परिसरातील रस्ते स्वच्छ केले जातात. यापुढे दर आठवड्याला यापद्धतीने स्वच्छता करण्यात येईल. नुसत्या झाडूने कचरा काढताना वरवर सफाई होते, मात्र भाज्यांचा सुकलेला चिखल निघत नाही व त्यामुळे अपघातही होतात. त्यामुळे ब्रशने स्वच्छता करण्यात येणार असल्याचे जी उत्तर विभाग कार्यालयाच्या घन कचरा विभागातील अधिकारी इरफान काझी यांनी सांगितले.

मुंबई बाहेरून भाज्या व फुले घेऊन येणाऱ्यांना सकाळी सात वाजल्यानंतर मनाई करण्यात येते आहे. तसेच या व्यापाऱ्यांना सात नंतर रस्त्यावर थांबण्यास, सामान उतरवण्यास किंवा गाड्या थांबवण्यासही मनाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button