WWE स्टार केन नॉक्स कौंटी शहराचा महापौर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/mayor-usa.jpg)
टेनेसी (अमेरिका) – WWE ची रिंग गाजवणारा रेसलर ग्लेन जेकब्ज अर्थात केन आता राजकारणाची रिंगही गाजवत आहे. केन नुकताच अमेरिकेच्या टेनेसीमधील नॉक्स कौंटी शहराचा मेयर अर्थात महापौर बनला आहे. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार केनला 31,739 मते मिळाली, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हेलीला 16,611 मते मिळाली.
ग्लेन जेकब्ज 1 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारेल. गतवर्षी केनने WWE रिंगमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. संधी मिळाली तर राजकारणासह रेसलिंगही करेन, असे त्याने म्हटले होते.
6 फूट 8 इंच उंचीच्या केनचा नव्वदच्या दशकात WWE च्या रिंगमध्ये दबदबा होता. बराच काळ तो WWE चा हेवीवेट चॅम्पियनही होता. मोठे केस आणि लाल रंगाचा मास्क हीच केनची ओळख होती. मात्र नंतर त्याने आपला लूक बदलला. त्याने टक्कल केले होते आणि मास्कही काढला होता.
केन अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय होता. ग्लेन जेकब्ज मागील वीस वर्षांपासून टेनेसेमध्येच राहतो. सध्या तो पत्नीसोबत विमा आणि एक रियल इस्टेट कंपनी चालवतो.