#Coronolockdown:लॉकडाऊन संपवून चालणार नाही, कोरोनावर हा एकमात्र उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_100924.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार सुरु करण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारांचे कौतुक केले. लॉकडाऊनला संपवून चालणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी हा एकमात्र उपाय आहे. राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या.
कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराशी सामना करताना भारताला मिळालेल्या यशाला जागतिक मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचे भारत सरकार कौतुक करत आहे. कोरोनाच्या संकटापासून ग्रामीण भारत मुक्त राहावा यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं.
देशाच्या अनेक भागांमध्ये हळूहळू आर्थिक व्यवहार, उद्योग सुरू झाले आहेत. येत्या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हे काम अधिक वेगाने होईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईल आता लक्ष केंद्रीय करणे गरजेचं आहे. या मार्गावर पुढील काळात अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रणनीती बनवून राबवली गेली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पुढच्या लॉकडाऊनबाबत 15 तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे तयारी करता येईल, याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून 18 तारखेपासूनच्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात समाविष्ट करू. ग्रीन झोन्समध्येही आपल्याला लक्ष्य द्यावे लागणार आहे. आता मान्सून सुरु होईल. अनेक रोग या दरम्यान येतात, अशा वेळी आपले डॉक्टर, दवाखाने सज्ज ठेवावे लागतील, नवीन संकट नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
जगातला पर्यटन व्यवसाय संकटात आहे. भारताने या परिस्थितीत आपण बारकाईने विचार करून पर्यटनाचे नवे प्रकार विकसित करावेत. वर्षानुवर्षे काम केले ते ठिकाण सोडून मजूर आपल्या राज्यात चालले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. ज्या राज्यात कामगार परतले आहेत तिथल्या राज्यांना देखील आव्हान असेल. राज्यांना यावर तोडगा काढावा लागेल, असं प्रंतप्रधान मोदींनी सांगितलं.