#CoronaVirus:सोलापुरात कोरोना बाधितांचा आकडा 470 वर
सोलापूर : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सोलापुरातही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 14 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 470 वर पोहोचली आहे.
शिवाय, सोलापुरात आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सोलापुरातील कोरोनाबळींचा आकडा 33 वर पोहोचला आहे. 18 मे रोजी मृत्यू झालेल्या 74 वर्षीय पुरुष, 19 मे रोजी मृत्यू झालेल्या 77 वर्षीय पुरुष आणि 64 वर्षीय महिलेचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला.
आज आढळलेले सर्व रुग्ण आणि मृत व्यक्ती शहरातीलच आहेत. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 462 तर मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील स्थितीत आज बदल नाही, ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण 8 कोरोनाबाधित आहेत. यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. तर आज सोलापुरात एकूण 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 175 जण कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. उर्वरित 262 जणांवर उपचार सुरु आहेत