३ ते ४ दहशतवाद्यांना सुरक्षादलाने घेरलं, चकमक अद्यापही सुरूच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/encounter-terrorists.jpg)
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे सुरक्षा दलाने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लष्कराच्या जवानांनी परिसराला चारही बाजुनी वेढले असून चकमक अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या वृत्ताला लष्कराकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
सुरक्षा दलाला केलम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी केलम गावाला चारही बाजुनी वेढले. त्यानंतर परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. त्याचवेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारताच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याठिकाणी दोन्ही बाजुनी गोळीबार अद्यापही सुरूच आहे.