स्पेक्ट्रम प्रकरणी जिओ आणि आरकॉमला सुप्रीम कोर्टाची नोटीस
नवी दिल्ली – रिलायन्स जिओ आणि आरकॉम यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवून स्पेक्ट्रमच्या सर्व व्यवहारांची सविस्तर माहिती देण्याचा आदेश दिला आहे. रिलायन्स जिओ आता आरकॉमच्या स्पेक्ट्रमचा वापर करत आहे. या दोन कंपन्यांमध्ये स्पेक्ट्रम शेअरिंग एग्रीमेंट झालेले आहे. त्याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावर पुढील सुनावणी सोमवारी १७ ऑगस्टला होणार आहे.
दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असलेल्या टेलिकॉम कंपन्यांकडून ३८ हजार कोटींची एजीआर थकबाकी वसूल करण्यासाठी योजना आखण्याची सूचना मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली होती. हे पैसे भरण्यासाठी १५ ते २० वर्षांचा वेळ दिल्यानंतरही ते सर्व पैसे वसूल झालेले नाहीत. त्यामुळे दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांनी स्पेक्ट्रमच्या वापराची सविस्तर माहिती द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिश्रा यांनी म्हटले आहे. यात आरकॉम आणि एयरसेल या कंपन्यांचा समावेश आहे.





