सम-विषम वाहन नियमांचे भाजप नेत्यांकडून प्रतीकात्मक उल्लंघन

भाजपचे नेते विजय गोयल यांनी सोमवारी दिल्लीत लागू करण्यात आलेल्या सम-विषम वाहनांच्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांना चार हजार रुपये दंड करण्यात आला. या योजनेच्या आपण विरोधात असून त्याचा प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी हे उल्लंघन केले, असे गोयल यांनी म्हटले आहे. आज सम संख्या क्रमांक असलेल्या वाहनांना परवानगी असताना गोयल यांनी विषम क्रमांकाची एसयूव्ही गाडी चालवली. केजरीवाल यांनी लागू केलेली सम-विषम वाहने योजना हा निवडणूक स्टंट असल्याची टीका गोयल यांनी केली आहे.
गोयल यांच्या निषेधावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले, की भाजप नेत्यांचे काम राजकारण करणे हेच आहे. त्यांच्याजवळ या प्रश्नाचे कुठलेच उत्तर नाही. जर गोयल यांना दिल्लीतील लोकांची काळजी वाटत होती तर त्यांनी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना या प्रश्नावर बैठक घेण्यास सांगायला हवे होते. गोयल यांनी त्यांची एसयूव्ही गाडी अशोका रोडवरील निवासस्थानातून बाहेर काढली व ते भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू व इतर नेत्यांसमवेत जात असताना त्यांना जनपथ येथे वाहतूक पोलिसांनी अडवले. तेथे त्यांना दंड करण्यात आला. २०१६ मध्ये या नियमाच्या उल्लंघनासाठी २००० रुपये दंड होता तो आता ४ हजार रुपये करण्यात आला आहे. गोयल यांच्या गाडीवर ‘प्रदूषण की जिम्मेदार केजरीवाल सरकार, ऑड इव्हन है बेकार’ असे लिहिलेले होते. गेल्या पाच वर्षांत केजरीवाल सरकारने प्रदूषणावर काहीच केले नाही. ते आता निवडणूक जवळ आल्याने स्टंटबाजी करीत आहेत, अशी टीका गोयल यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलताना केली.
- योजनेस शंभर टक्के प्रतिसादाचा केजरीवाल यांचा दावा
हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत सम-विषम वाहनांची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार एका दिवशी सम तर दुसऱ्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाडय़ा चालवण्याची परवानगी आहे. या योजनेला लोकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
सकाळी आठपासून ही योजना लागू करण्यात आली. कुटुंब व मुलांच्या सुरक्षेसाठी सम-विषम योजनेचे पालन करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे निवासस्थानाच्या ठिकाणाहून सायकलवर निघाले. वाहतूकमंत्री कैलाश गेहलोत हे सहकारी अधिकाऱ्यांच्या मोटारीतून सचिवालयात गेले. दिल्लीत वाहतूक पोलीस कमी दिसत असल्याच्या टीकेवर केजरीवाल यांनी सांगितले की, आपण गरज पडली तर नायब राज्यपालांशी बोलू. गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोन तास दिल्लीतील रस्त्यावरून फिरले व त्यांना लोक नियमांचे पालन करताना दिसले. आज सम क्रमांकाच्या वाहनांना परवानगी दिल्याने तेवढीच वाहने रस्त्यावर होती.





