Breaking-newsराष्ट्रिय
‘शबरीमला’च्या पायथ्याशी तणाव, 11 महिलांकडून मंदिर प्रवेशाचा प्रयत्न
केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशावरुन पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती आहे. रविवारी सकाळी 50 वर्षांहून कमी वय असलेल्या 11 महिला दर्शनासाठी आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. जंगल मार्गाद्वारे आल्यानंतर मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तेथेच थांबावं लागलं. भाविकांकडून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विरोध करणाऱ्या काही भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दुसरीकडे, महिला भाविकांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू असताना अयप्पाचे भक्त कोट्टायम रेल्व स्टेशनवर आंदोलन करत आहेत. जवळपास 30 महिला मंदिरात दर्शनासाठी येऊ शकता याची पूर्वकल्पना पोलिसांना होती त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षाच्या महिलांना प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने नवा वाद सुरू झाला आहे.