व्हिडीओ कॉल ते ई-पेमेंट, भारताचं पहिलं सोशल मीडिया अॅप ‘एलिमेंट्स’ लाँच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Elyments.jpg)
नवी दिल्ली : चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडिया वापरासाठी भारतात स्वदेशी अॅपची मोहिम सुरु झाली आहे. या अंतर्गत भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. जवळपास 1000 पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञ हे स्वदेशी अॅप तयार करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
याच मोहिमेचा भाग म्हणून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने एक भारतीय सोशल मीडिया सुपर अॅप ‘इलायमेंट्स’ तयार केले आहे.
या अॅपला तयार करताना अनेक आय तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. इतर वेगवेगळ्या सोशल मीडिया अॅपमध्ये जे सर्व फिचर्स आहेत ती सर्व या एकाच अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असंही बोललं जात आहे. यात सोशल कनेक्टिव्हिटीसोबत चॅटिंग, ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, ई-पेमेंट, ई-कॉमर्ससारखे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे अॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रायव्हसी एक्सपर्ट्सच्या मदतीने यूजर्सच्या डाटाची पूर्ण सुरक्षितता पाळण्यात आली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगने या अॅपमध्ये वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. अनेक महिने सातत्याने अॅपची चाचणी घेण्यात आली आहे. यासाठी वापरकर्त्यांची सर्व माहिती देशातच ठेवण्यात येणार आहे. इतर कुणीही तिसरी व्यक्ती ही माहिती चोरी शकणार नाही, असाही दावा करण्यात आला आहे. सध्या हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत जवळपास 1 लाख जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
आज (रविवार, 5 जुलै) देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या पहिल्या स्वदेशी सोशल मीडिया अॅपचं लाँचिंग केलं. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर देखील उपस्थित होते.