युरेनियम शुद्धीकरण मर्यादा ओलांडून इराणचा खेळ
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इराणबरोबरच्या २०१५ मधील अणुकरारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता त्या करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची कमाल मर्यादा इराणने ओलांडली आहे. हे घातक लक्षण असून इराण आगीशी खेळत आहे असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी याआधी असे म्हटले होते, की इराणने युरेनियम शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबवावी.
सोमवारी इराणने पहिल्यांदा करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडली होती. युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडल्याच्या या वृत्तास आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी वार्ताहरांना सांगितले,की युरेनियम शुद्धीकरणाची करारातील मर्यादा ओलांडून इराण आगीशी खेळत आहे.
परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे,की इराणने युरेनियमचे शुद्धीकरण थांबवावे. इराणकडे अण्वस्त्रे असणे हे जगाच्या दृष्टीने घातक असून अमेरिका इराणशी नवा करार करण्यास तयार आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेस असलेला धोका टाळता येईल. इराण जितक्या प्रमाणात राजनयाच्या मार्गापासून दूर जाईल व अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करील तितके त्याच्यावर आर्थिक दडपण वाढत जाईल, तसेच तो देश इतरांपासून वेगळा पडत जाईल. आण्विक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इराणने आणखी काही पावले पुढे टाकली आहेत. कुठल्याही अणुकरारात इराणला युरेनियम शुद्धीकरणाची परवानगीच द्यायला नको. २००६ पासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सहा ठराव संमत केले असून त्यात इराणला युरेनियम शुद्धीकरण व त्याची फेरप्रक्रिया करण्यास प्रतिबंधित केले आहे. तेव्हाची ती अट योग्यच होती व आताही योग्य आहे.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सांगितले,की माझा इराणला कुठलाही संदेश नाही, ते काय करीत आहेत हे त्यांना ठाऊक आहे. ते कशाशी खेळत आहेत हे त्यांना माहिती आहे. माझ्या मते ते आगीशी खेळत आहेत. त्यामुळे त्यांना कुठलाही संदेश नाही.