म्यानमार लष्करप्रमुखांसह 20 जणांना फेसबुकवर बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/facebookt-.jpg)
यांगून (म्यानमार ) – म्यानमारच्या लष्कर प्रमुखांसह 20 व्यक्ती आणि संघटनांना फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीनुसार ही बंदी लागू करण्यात आल्याचा खुलासा फेसबुकने केला आहे. म्यानमारचे लष्करप्रमुख आणि एक वरिष्ठ अधिकारी यांनी रोहिंग्या मुस्लिमांवर केलेल्या कारवाईसाठी त्यांच्यावर नरसंहाराचा अभियोग चालवला पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या चौकशी शिफारशींत सांगण्यात आले आहे.
लष्करी सत्ता असलेल्या म्यानमारमध्ये माहिती आणि बातम्यांसाठी फेसबुक हा प्राथमिक स्रोत आहे. परंतु लष्कर आणि कट्टरपंथी बौद्ध यांच्यासाठी फेसबुक म्हणजे रोंहिंग्या आणि अन्य अल्पसंख्याक यांच्याविरुद्ध द्वेष निर्माण करणारी भाषणे आणि पोस्ट टाकण्यासाठीचा मंच बनले आहे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपास यंत्रणेने या वर्षाच्या सुरुवातीलाच फेसबुकवर टीका केली होती.
आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशींनुसार फेसबुकने सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ सीनियर जनरल मिन आँग हलाईंग यांच्यासह 20 व्यक्ती आणि संघटनांना फेसबुकवर बंदी घातलेली आहे. जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी वा तो वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे स्पष्टीकरणही फेसबुकने दिले आहे.
लष्कर प्रमुखांचे दोन फेसबुक अकाऊंटस आहेत. त्यातील एकाचे 13 लाख फॉलोअर आहेत, तर दुसऱ्याचे 28 लाख फॉलोअर्स आहेत.