भाजप नेत्याच्या दारूड्या चिरंजीवाने घेतला दोघांचा बळी

जयपुर – राजस्थानातील भाजप नेत्याच्या मुलाने दारूच्या नशेत वाहन चालवून दोन जणांना ठार केल्याची घटना घडली आहे. भारतभूषण मीना असे या आरोपीचे नाव असून ते भाजपच्या स्थानिक नेत्याचे चिरंजीव आहेत. शुक्रवारी रात्री ते दारूच्या नशेत आपली एसयुव्ही गाडी चालवत होते. त्यांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने चार मजुरांना धडक दिली. त्यात दोन जण ठार झाले तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भारतभूषण मीना यांना अटक केली आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की शुक्रवारी रात्री ते आपली गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती गाडी फुटपाथवर झोपलेल्या मजुरांच्या अंगावरून गेली. त्यात हे चौघे जण चिरडले केले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.
जयपुर शहरातील गांधीनगर रेल्वे स्टेशन नजिक हा प्रकार घडला. त्यांचे वडिल बद्रीनारायण मीना हे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत. ही एसयुव्ही गाडी त्यांच्याच नावावर आहे. या गाडीच्या मागच्या काचेवर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेचे पोस्टर व त्यांचा फोटोही त्याच्यावर आहे.





