बलात्काराच्या आरोपीला पोलीस अधीक्षकांनी घातल्या गोळ्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Ajay-Pal-Sharma.jpg)
उत्तर प्रदेशमधील रामपुरमध्ये शनिवारी रात्री (२२ जून २०१९) पोलीस आणि स्थानिक गुंडांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये बालात्कार आणि हत्येचा आरोप असणाऱ्याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आहे. ६ मे रोजी ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या नाजिल या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्याने पोलिसांना त्याला पकडणे शक्य झाले.
काय आहे प्रकरण
रामपूरमधील एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे ६ मे रोजी अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्या नाजिलने नंतर त्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सिव्हील लाइन पोलीस मागील दीड महिन्यापासून नाजिलच्या शोधात होते. त्यातच या मुलीचा मृतदेह सापडल्याने सर्वच स्तरांमधून पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पोलिसांनी नाजिलला शोधण्यासाठी अनेक टीम्स तयार केल्या. अखेर काल पोलिसांना नाजिलला पकडण्यात यश आले.
‘७ मे रोजी मुलीच्या अपहरणाची माहिती मिळाली होती’
या प्रकरणासंदर्भात बोलताना अजय पाल शर्मा यांनी ‘सिव्हील लाइन पोलीस स्थानकांमध्ये ७ मे रोजी ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यता आली होती’, अशी माहिती दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला होता. याच गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आरोपीचा माग काढत पोलीस त्याचा अटक करण्यासाठी पोचले असता पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्या आणि त्याचा अटक केल्याचे अजय यांनी सांगितले.
अजय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
उत्तर प्रदेश पोलीस दलाचे कौतुक केले जात आहे. अजय पाल शर्मा यांनी पडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला अशी भावना सोशल मिडियावरुन व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे पोलिसांनी धडक कारवाई केल्यास महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचे भय निर्माण होईल असंही नेटकऱ्यांच म्हणणं आहे.