‘पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन अंतराळवीर’ होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Mandlal.jpg)
दक्षिण आफ्रिकेतील अंतराळवीर मांडला मॅसेको यांचा दुचाकी अपघातात दूर्देवी मृत्यू झाला आहे. मांडला हे ३० वर्षांचे होते. अंतराळात जाणारा पहिला दक्षिण आफ्रिकन अंतराळवीर होण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. शनिवारी झालेल्या एका अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदनाद्वारे दिली आहे.
अमेरिकेतील अंतराळ अकादमीने २०१३ साली आयोजित केलेल्या एका उपक्रमामध्ये मांडला यांची निवड करण्यात आली होती. अंतराळ प्रशिक्षणासाठी १० लाख जणांनी अर्ज केला होता. त्यामधून अकादमीने २३ जणांची निवड केली होती. ज्यामध्ये मांडला यांचा समावेश होता. अवकाशात झेपावणारा आफ्रिकेतील पहिला कृष्णवर्णीय (ब्लॅक आफ्रिकन) अंतराळवीर होण्याचे त्यांचे स्वप्न होतं. मान त्यांना मिळणार होता. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
मांडला हे दक्षिण आफ्रिकेतील वायुदलाचे सदस्य होते. २०१३ साली त्यांची निवड झाल्यानंतर २०१५ मध्ये ते नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरमध्ये अवकाश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या काही चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. सब ऑर्बिटल उड्डाणसाठी लागणारे काही तासांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. हे अंतराळयान २०१५ साली अवकाशात झेपावणे अपेक्षित होते मात्र अंतिम क्षणी त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र प्रशिक्षणामध्ये त्यांनी १० हजार फुटांवरुन स्कायडाइव्ह करणे, व्हॉमीट कॉमेट अशा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यांना अंतराळात जाण्याची संधी कधीच मिळाली नाही. २०१५ साली अंतराळात यान पाठवणाऱ्या कंपनीने आपली मोहिम २०१७ ला करण्याचे ठरवले. मात्र २०१७ ला एक्सकोर एरोस्पेस नावाची ही कंपनी तोट्यात गेल्यानं बंद झाल्याचे स्पेस डॉट कॉमने दिलेल्या वृतात म्हटले. ही कंपनी बंद होण्याबरोबर मांडला यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडले. मांडला हे अमेरिकेतून पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतले आणि खासगी वैमानिक म्हणून काम करु लागले.
आपल्याला दक्षिण आफ्रिकेतील तरुणांसमोर एक चांगले उदाहरण ठेवायचे आहे असं मांडला नेहमी म्हणायचे. तुमची पार्श्वभूमी कितीही हालाखीची आणि गरिबीची असली तरी तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही हवं ते मिळवू शकता हे मला दक्षिण आफ्रिकेतील तरुणांना दाखवून देत त्यांना प्रेरणा देणारे काम करुन दाखवायचंय असं मांडला म्हणायचे. मांडला यांच्या जाण्याने दक्षिण आफ्रिकन तरुणांसाठी आदर्श असणारे एक व्यक्तीमत्व गमावल्याची भावना समाजमाध्यमांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
‘अॅफ्रोनॉट’ तसेच ‘स्पेसबॉय’ या टोपणनावांनी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये ओळखलं जायचं. दोन टोपणनावे असणारे मांडला स्वत:ची ओळख करुन देताना प्रोटोरियामधील असल्याचे अभिमानाने सांगायचे. मांडला हे मुळचे प्रिटोरिया या दक्षिण आफ्रिकेतील शहरातील रहिवाशी असल्याने ते आपली ओळख शहराच्या नावाने करुन द्यायचे.