निर्भयाच्या दोषींना फाशी देणारा जल्लाद म्हणतो, या कमाईतून करणार मुलीचं लग्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/nirbhaya-case-jallad-pawan.jpg)
दिल्लीत सात वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. एका तरूणीवर अत्यंत क्रूरपणे सामुहिक बलात्कार करण्यात आला. या बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला. २० मार्च २०२० ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधी अखेरच्या टप्प्यात दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. दोषींनी रडारड करून आणि लादीवर लोळून बचावाचा प्रयत्न केला, पण या चौघांना अखेर सकाळी साडे पाचच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले. पवन या जल्लादाने या चौघांना फासावर लटकवण्याची औपचारिकता पूर्ण केली.
जल्लाद असलेल्या पवन यांनी त्या चार दोषींना फासावर लटकवल्यानंतर त्यांना फार समाधान वाटले. पण त्यांना वाटलेले समाधान हे केवळ क्रूर दोषींना फासावर लटकवल्याचे नव्हते, तर त्यांच्या मुलीच्या लग्नासंबंधी गोष्टीचेही होते. जागरणच्या वृत्तानुसार या चार दोषींना फाशी देऊन झाल्यावर या कामाचे जे मानधन म्हणून पैसे मिळणार आहेत, त्या पैशातून पवन हे आपल्या मुलीचे लग्न करणार आहेत. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या चार दोषींनी फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पवन यांना खूप आनंद झाला होता. या कामाचे जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडेन. माझ्या मुलींची लग्न आणि काही कर्जे फेडता येतील, असे पवन म्हणाले होते.