नक्षलवाद्यांनी डायनामाईटने उडवले भाजपा नेत्याचे घर

बिहारमधील गया जिल्ह्यातील डुमरिया परिसरात बुधवारी रात्री भाजपा नेते आणि माजी आमदार अनुजकुमार सिंह यांचे घर नक्षलवाद्यांनी डायनामाईटने उडवून दिले. या हल्ल्यात जीवितहानी झाली की नाही याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची मागणी असलेले पत्रक तिथे टाकले आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री उशिरा एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भाजपा नेत्याच्या घरावर हल्ला केला. अनुजकुमार सिंह हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते, असे सांगण्यात येत आहे. सिंह यांच्या घरावर झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला होता. या स्फोटात भाजपा नेत्याचे घर संपूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात अजूनही दहशत आहे. नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.





