धक्कादायक! पोलीस शिपायाची हिंगोलीत गळफास घेऊन आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/fashi.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
तालुक्यातील इसापूर रमना येथील रहिवासी व मुंबई पोलीस दलातील कार्यरत शिपाई केशव बाभनाजी वानखेडे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आलेली आहे. इसापूर रमणा येथील केशव वानखेडे हे मुंबई, वरळी पोलीस मुख्यालयात मागील १७ वर्षांपासून पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत होते; परंतु काही कामानिमित्त ते त्यांच्या गावी हिंगोली तालुक्यातील इसापूर येथे रजेवर आले होते.
१३ फेबु्रवारी रोजी परत ते कर्तव्यावर हजर होणार असल्याने त्यांनी वरळी येथे जाण्याची संपूर्ण तयारी केली. त्यानंतर ते शेतातून फेरफटका मारून येतो, असे नातेवाईकांना सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ निघून गेला, परंतु ते घरी परतले नाहीत. त्यानंतर सकाळच्या सुमारास केशव वानखेडे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली शहर) आर. आर. वैजणे, सपोनि आर. एच. मलपिलू, एएसआय मगन पवार, पोउपनि. भोसले, बीट जमादार राठोड आदींनी भेट देऊन पंचनामा केला.