आता ‘या’ फिरकी गोलंदाजाच्या जीवनावर येणार बायोपिक, पोस्टर रिलीज!
फिरकीचा जादुगर दिसणार मोठ्या पडद्यावर

Muttiah Muralitharan : श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हा एक महान खेळाडू आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना कोड्यात टाकणाऱ्या मुरलीधरनच्या जीवनावर आता बायोपिक येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची घोषणा करतांना त्याचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.
मुथय्या मुरलीधरन यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘८००’ (८०० The Movie) असे असणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. मुरलीचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचे पोस्टर आणि नाव समोर आल्याने चाहते उत्साहित झाले आहेत.
मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर येणारा हा चित्रपट चाहत्यांच्या आठवणी ताज्या करणार आहे. हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना तो हिदी, तमिळ, तेलुगू भाषेत पाहायला मिळणार आहे. स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातुन लोकप्रियता मिळवणारा अभिनेता मधुर मित्तल मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान मुथय्या मुरलीधरन आज ५१ वर्षांचा झाला आहे. मुरलीधरन याच्या नावावर अनेक विक्रम आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून त्याने १३४७ विकेट आहेत, जो एक विश्वविक्रमही आहे. मुरलीधरनने कसोटीत १३३ सामन्यांत सर्वाधिक ८०० विकेट्स घेतल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३४ बळी घेतले आहेत. मुरलीच्या फिरकीसमोर हादरणारे फलंदाजही चित्रपटाद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.





