चप्पल घातल्याने आणि शर्टचं बटण न लावल्याने टॅक्सी चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई

राजस्थानमध्ये वाहतूक पोलिसांनी एका टॅक्सी चालकावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे चालकाने चप्पल घातली असल्याने तसंच शर्टचं बटण न लावल्याने वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या देशभरात नवीन मोटार वाहन कायद्यासंबंधी चर्चा सुरु असून त्याची अंमलबजावणी केली जावी की नाही यावरुन राज्यांमध्ये मतांतर आहे. देशातील अनेक ठिकाणी वाहनचालकांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. राजस्थानमध्ये अद्याप नवा कायदा लागू करण्यात आलेला नाही. मात्र पोलीस जुन्या कायद्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबाजवणी करताना दिसत आहेत.
६ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये ही घटना घडली आहे. वाहतूक पोलिसांनी संजय सर्कलजवळ टॅक्सी क्रमांक RJ14TE0556 च्या चालकावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी माधो सिंह यांनी ही कारवाई केली आहे. कारवाई करताना त्यांनी चालकाने शर्टचं बटण लावलं नसल्याचं तसंच वाहन चालवताना चप्पल घातली असल्याचा उल्लेख केला आहे.





