गोरक्षणासाठी मुस्लिमांनीही पुढाकार घ्यावा – रामदास आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/AATHVAL.jpg)
नवी दिल्ली– गाय ही हिंदुसाठी अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाच्या नावाखाली काही अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रकार देशात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांनीही गोरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर लिहीण्यात आलेल्या मुसलमान और योगी अदित्यनाथ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही मुस्लिमांवर अत्याचार झाले. हा प्रकार अनेकवेळा गोरक्षणाच्या नावाने झाला. या पार्श्वभूमीवर आता मुस्लिमांनीही गोरक्षणासाठी योगदान दिले पाहिजे. कारण गाय ही हिंदुसाठी आदराचा विषय असल्याने त्यांच्या भावनांचीही कदर झाली पाहिजे. मोदी आणि अदित्यनाथ हे मुस्लिम विरोधी नाहीत. पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेतूनही हे ध्वनीत होते आहे असे ते म्हणाले.
हिंदु आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवणाऱ्यांचा या देशात पराभव होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आपल्या शैलीत काही काव्य पंक्ती ऐकवताना ते म्हणाले की , युपी मे चमक रहा है योगी अदित्यनाथ का तारा, हिंदु-मुसलमान को लडाने वालोंका बजा देंगे बारा. अयोध्या विषयावरून हिंदु आणि मुसलमान यांनी संघर्ष करू नये. याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण प्रतिक्षा केली पाहिजे असे ते म्हणाले. अयोध्या ही मुळात बुद्धांची भूमी होती असे विधानही त्यांनी यावेळी केले. पत्रकार इरफान शेख यांनी हे पुस्तक लिहीले आहे. त्यात योगी अदित्यनाथ यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत असतानाच त्यांचे मुस्लिमांविषयीचे धोरण आणि त्यांच्याशी असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.