खासदार साध्वी प्रज्ञा यांना जीवे मारण्याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/sadhvi-pragya-thakur.jpg)
भोपाळ – भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अज्ञात क्रमांकाद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळच्या पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. भोपाळ पोलिसांच्या सायबर सेलने मोबाईल क्रमांकाच्या आधारावर चौकशी सुरू केली आहे. साध्वींना अयोध्येतील राम मंदिर उभारणीसंबंधीच्या विधानानंतर धमकी मिळाली आहे.
‘मी देशभक्त असून देशासाठी बलिदान करण्यास तयार आहे. धमकी देणारा समोर आल्यास त्याला त्याची कुवत समजणार आहे. पाठीमागून वार करणारे लोक भ्याड असतात’, असे साध्वींनी म्हटले आहे.
राफेल विमानासंबंधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या विधानाचा साध्वींनी समाचार घेतला आहे. शत्रूदेशाच्या तोंडची भाषा बोलणाऱ्यांना देशभक्त तरी म्हणता येणार नाही. राफेल-राफेल करून राहुल गांधी यांनी स्वतःचा सत्यानाश करवून घेतला आहे. राफेल आल्याने देशाची सुरक्षा बळकट होणार आहे. राफेलला विरोध करणारे देशद्रोही असू शकतात. देश बळकट होतो तेव्हा देशद्रोही तळमळू लागतात, असे त्या म्हणाल्या.