कैलास मानसरोवरजवळ चीनकडून क्षेपणास्त्रच्या तळाची उभारणी सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-51-1.jpg)
नवी दिल्ली – हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर परिसरात चीनकडून जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा तळ उभारण्याचे काम जोरात सुरु आहे. याचे काम एप्रिल महिन्यात सुरु झाले होते. सॅटलाइट फोटोंवरून ही बाब उघड झाली आहे.
पूर्व लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. तसेच कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किलोमीटरचा रस्ता बांधला असून चीनकडून धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्करीकरण सुरु आहे. कैलास पर्वत आणि मानसरोवर भागातील अनेक ठिकाणे धार्मिकदृष्टया हिंदुंसाठी खूप महत्त्वाची असून सॅटलाइट फोटोंच्या विश्लेषणावरुन चीनची मानसरोवर भागात जमिनीवरुन हवेत मारा करणारी HQ-9 सॅम मिसाइल सिस्टिम तैनात करण्याची योजना आहे. क्षेपणास्त्र प्रणालीबरोबर वाहनआधारीत रडार यंत्रणाही सज्ज असेल. HQ-9 मिसाइल सिस्टिम HT-233 रडारवर अवलंबून असते. त्याशिवाय टाइप 305B, टाइप 120, टाइप 305A, YLC-20 आणि DWL-002 रडार्सही असतील. ही रडार्स टार्गेटला शोधून खात्मा करण्यात मदत करतील.