केजरीवालांची पोलिसांकडून तीन तास चौकशी
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आलेल्या धक्कबुक्कीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सलग तीन तास चौकशी केली. दिल्ली पोलिसांनी त्यासाठी सहा अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले होते. त्यांची चौकशी पुर्ण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की एका खोट्या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांचीच अशा पद्धतीने पोलिस चौकशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी आपल्या सिव्हीललाईन्स परिसरातील ऑफिस व निवासस्थानावर जवळपास छापाच टाकल्या सारखी स्थिती केली होती असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी ट्विटरवर केला आहे. तथापी ही चौकशी अत्यंत चांगल्या वातावरणात झाल्याचेही त्यांनी नमूद केले. काल संध्याकाळी 5 वाजून 10 मिनीटांनी ही चौकशी सुरू झाली ती रात्री साडे आठ वाजेपर्यंत सुरू होती. दिल्लीचे अतिरीक्त आयुक्त हरेंद्रसिंग हे या चौकशी पथकाचे प्रमुख होते. आम्ही त्यांचा जबाब नोंदवून घेण्याचे काम केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.