इराणबरोबरचा आण्विक करार मोडल्याने अमेरिका “व्हीलन”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/usa-1-2.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणबरोबरचा आण्विक करार मोडल्याने अमेरिका संपूर्ण जगाच्या नजरेतून “व्हीलन’ बनली आहे. इतकेच नाही, तर युरोपियन देशांच्या नजरेतही अमेरिका खुपू लागली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर एंजेला मर्केल यांच्या मते इराणबरोबरचा आण्विक करार मोडून अमेरिकेने मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडवली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. एंजेला मर्केल आणि ब्लादिमीर पुतीन यांच्यात नुकतीच रशियातील सोची शहरात चर्चा झाली. मध्यपूर्वेतील अन्य समस्यांबरोबरच इराणबरोबरच्या आण्विक करारासंबंधातही या दोन नेत्यांनी विचारविनिमय केला.
इराणच्या आण्विक कार्यक्रमात पारदर्शकता आणण्याबरोबरच त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने इराणबरोबरचा करार महत्त्वपूर्ण होता, असे मर्केल यांचे म्हणणे आहे. अन्य युरोपियन देशांप्रमाणेच जर्मनी या करारातून बाहेर पडू इच्छित नाही. जर्मनीच्या सरकारी प्रसारण कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिका आता विश्वसनीय सहकारी राहिला नसल्याचे मत 82 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मर्केले यांच्या अगोदर युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनॉल्ड टस्क यांनीही आण्विक करारातून बाहेर पडल्याबद्दल डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. डोनॉल्ड ट्रम्प यांनी दोस्तापेक्षा दुष्मनाचेच काम जास्त केले आहे. ज्याच्यकडे ट्रम्प यांच्यासारखा दोस्त आहे, त्याला आणखी वेगळ्या दुष्मनाची आवश्यकताच नाही, असे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या विरोधात संयुक्त युरोपियन मोर्चा बनवण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
सन 2015 मध्ये बराक ओबामा अध्यक्ष असताना अमेरिकेसह रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांनी मिळून इराणबरोबर आण्विक करार केला होती. आणि तेव्हापासूनच डोनॉल्ड ट्रम्प या करारावर टीका करत आले आहेत. अखेर या करारातून अंग काढून घेऊन ट्रम्प यांनी अमेरिकेला “व्हीलन’ बनवण्याचे काम केले आहे.