Breaking-newsराष्ट्रिय
आघाडीच्या नेतृत्वाचा चेहरा राहुल गांधींचाच असावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rahul-gandhi-apologize-1-1.jpg)
कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांचा आग्रह. आघाडी विषयी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यांकडेच
नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी समविचारी पक्षांबरोबर आघाडीचे निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेस कार्यकारिणीने आज पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना अधिकार दिले. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणी, विविध राज्यांमधील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कॉंग्रेस विधीमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. निवडणूकीच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील विविध राजकीय पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबतचे अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच प्रस्तावित आघाडीच्या नेतृत्वाचा चेहरा राहुल गांधी यांचाच असावा असा आग्रहही यावेळी पक्षाच्या नेत्यांनी धरला.
आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 40 पैकी 35 सदस्यांनी आपली मते मांडली. कॉंग्रेसने भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करायला हवे, या मुद्दयावरच या सदस्यांनी विशेष भर दिला. मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी हेच या आघाडीचे चेहरा असायला हवेत, अशी अपेक्षाही काही नेत्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात बोलताना कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी म्हणाल्या की राहुल गांधी हे विरोधी पक्षांची स्वाभाविक ओळख आहेत. त्यामुळे आघाडीचा चेहरा म्हणूनही राहुल गांधीच असायला हवेत. प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करून कॉंग्रेस पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सविस्तर सादरीकरण केले. कॉंग्रेस पक्ष 12 राज्यांमध्ये सक्षम स्थितीत आहे आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसोबत मिळून सार्वत्रिक निवडणूकीसाठी मोठी आघाडी उभी करता येऊ शकते, यावर चिदंबरम यांनी आपल्या सादरीकरणामध्ये विशेष भर दिला.