Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पाकिस्तान मुस्लिम लीगच्या उमेदवाराला जन्मठेपेची शिक्षा
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील निवडणूकीतले “पीएमएल-एन’ गटाचे उमेदवार हनिफ अब्बासी यांना अमली पदार्थविषयक 6 वर्षे जुन्या एका प्रकरणात रावळपिंडीतील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी अन्य 7 जणांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. अब्बासी यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी आदियाळा तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाला मोठा हादरा बसला आहे. नवाझ शरीफ आणि त्यांच्या कन्या मरियम यांना देखील सध्या आदियाळा तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.
दरम्यान 25 जुलै रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतपत्रिकाही छापून झाल्या आहेत आणि त्यावर अब्बासी यांचे नाव आणि निवडणूक चिन्हही छापले गेले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात डेरा इस्मायली जिल्ह्यात आज झालेल्या आणखी एका आत्मघातकी स्फोटामध्ये निवडणूकीतील तेहरीक ए इन्साफ पक्षाचे उमेदवार, या प्रांताचे माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते इक्रामुल्ला गंदापूर यांची हत्या करण्यात आली.
आत्मघातकी हल्लेखोराने गंदापूर यांच्या कारजवळच आत्मघातकी स्फोट घडवला. तर याच काळात जमाइत उलेमा इस्लाम फैज पक्षाचे नेते आणि खैबर पख्तुनवा प्रांताचे माजी मुख्यमंत्री अक्रम खान दुरानी यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. प्रचाराच्या सभेसाठी जात असताना त्यांच्या कारवर गोळीबार झाला. गेल्या 10 दिवसात त्यांच्यावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला झाला आहे.





