अमेरिकाही चिनी अॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-3.jpg)
नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली . त्यामुळे सर्वात प्रसिद्ध अशा Tik Tok, यूसी ब्राऊजर, शेअर इट सारख्या अनेक चिनी अॅप्सवर भारतात आता बंदी असणार आहे.
भारताच्या या निर्णयाचं अमेरिकेनेही स्वागत केलं आहे. आता अमेरिकाही चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भारतानंतर आता अमेरिकाही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं, “अमेरिका चिनी सोशल मीडिया अॅप्सवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यामध्ये Tik Tok चाही समावेश आहे.”
वुहानपासून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे अमेरिका सतत चीनवर निशाणा साधत आहे. यादरम्यान, भारत-चीन सीमेवर झालेल्या वादावरही अमेरिकेने भारताला समर्थन देत चीनवर टीका केली होती.
भारताने जेव्हा चिनी अॅप्सवर बंदी आणली, तेव्हा माईक पोम्पिओ यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. “आम्ही भारताच्या या निर्णयाचं स्वागत करतो”, असं ते म्हणाले होते. शिवाय, त्यांनी या अॅप्सना CCP (चिनी कम्युनिस्ट पक्ष) चा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. भारताच्या या निर्णयाने देशाच्या अखंडतेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला मजबुती मिळेल, असंही माईक पोम्पिओ म्हणाले होते