अपरिपक्व भाषणामुळे कॉंग्रेस उघडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/DSC_9730-.jpg)
- प्रकाश जावडेकर यांचे मत
पुणे – अविश्वासाच्या ठराबाबाबत संसदेमध्ये झालेली चर्चा सगळ्यांनी ऐकली. त्यावेळी एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांच्या अपरिपक्व भाषणामुळे कॉंग्रेस उघडी पडली. त्यांच्या भाषणात ना “मुद्दा’ होता ना “दम’, केवळ मिठी मारून नाटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते नाटक करण्याचे ठिकाण नाही तर मुद्दे मांडण्याचे ठिकाण आहे, असा टोला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी यांना लगावला. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना जावडेकर पत्रकारांशी बोलत होते.
अविश्वासाचा ठरावबाबत बोलताना मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी मुद्दे न मांडता केवळ “ड्रामाबाजी’ केली. जो मुद्दा मांडला. त्याबाबत केंद्र सरकारने खुलासा केला. मुळात त्यांचा गृहपाठ कच्चा असल्यामुळे कॉंग्रेस पूर्णपणे उघडी पडली असून, पक्षाची दिवाळखोरी समोर आली. त्यांना केवळ मोदी यांच्यावर देशाचे राजकारण करू इच्छितात. असे राजकारण होत नाही. सरकारचे काम लोकांसमोर आले. त्यांना केवळ मोदी द्वेषाचे राजकारण करायचे आहे. मात्र, द्वेषावर राजकारण चालत नाही. संसदेत अविश्वास ठराव टाळला गेल्याने सरकारने जनतेचा विश्वास, मन आणि हृदय जिंकले आहे.
दरम्यान, विद्यापीठातील भरतीच्या निर्णयासाठी थोडे दिवस थांबावे लागेल. आरक्षण कायम राहील. संस्थेचे एकत्र रोस्टर असेल, विभागवार नसेल. सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.
माध्यान्ह भोजनाबाबत ते म्हणाले, भोजनाबाबतचे स्वरूप काय असावे याचे प्रयोग राज्य सरकारने करावेत. यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दरडोई 9 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शासनाने 17 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दहा कोटी विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
परीक्षेसंदर्भात पालकांना माहितीपत्रके
आठवीपर्यंत नापास होण्याची भीती नसल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारी शाळा केवळ “आणा, खाणा आणि जाणा’ एवढ्यापुरत्याच राहिल्या आहेत. सातवीतल्या विद्यार्थ्याला चौथीचे गणित येत नाही, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आठवीपर्यंत न नापास या धोरणामध्ये बदल करण्यात आला असून, इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये दोन वेळा परीक्षा घेण्याचा किंवा न घेण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे. त्यामध्ये पाचवीमध्ये मार्च महिन्यातील परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तर दोन महिन्यांनी मे महिन्यात पुन्हा त्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातही तो नापास झाला तर त्याला पुन्हा त्याच वर्गामध्ये ठेवणार. विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करावा याची पालकांना माहिती व्हावी यासाठी पहिले ते आठवीच्या पालकांना माहितीपत्रके देणार आहे, असे त्यांनी सांगितले.