breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात काळी बाहुली लटकवली; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप

पुणे । प्रतिनिधी

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय उद्घाटन प्रसंगापासूनचं चांगलंच वादात अडकलं आहे. हे नवं कार्यालय आता पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यालयाला काळी उलटी बाहुली, बिब्बा लटकवले आहे. यावर आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप नोंदवत पक्षाला चूक दुरुस्त करण्याची सुचना दिली आहे.
काय आहे आक्षेप?
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हटलंय की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या पक्षकार्यालयाबाहेर काळी बाहुली, बिब्बा लावलेला असणं हे अंधश्रद्धेला चालना देणारी कृती आहे. त्यापार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचा हा प्रकार आपल्या मानसिकतेतून आणि दैनंदिन आयुष्यातील व्यवहारांमधून घालवण्यासाठी प्रयत्न करायची गरज असताना लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आणि भारतीय संविधानामध्ये असणाऱ्या नागरिकत्वाच्या कर्तव्यांचं पालनाचा अभाव आपल्याला दिसून येतोय.
पुढे त्यांनी म्हटलंय की, २१ शतकात आधुनिक माणूस म्हणून जगायला सक्षम होण्यासाठी लोकप्रतिनिधींना आणि सत्तेतल्या लोकांना याबाबत अधिक सजग असण्याची गरज आहे. त्यामुळे ही झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करतील. या प्रकारांना फाटा देत कालसुसंगत वर्तन करतील, अशी अपेक्षा मी करतोय, असंही त्यांनी म्हटलंय.
याबाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील आक्षेप नोंदवत म्हटलंय की, पुरोगामीपणाच्या उठता बसतां गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काळी बाहुली? गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.


‘राष्ट्रवादी’ म्हणते…

या प्रकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकूण 22 ऑफिसेस आहेत. जागेच्या मालकानं काळी बाहुली आणि कोहळा लावला असेल तर त्याबद्दल आम्हाला माहिती नाही. याबाबत आम्ही जागेच्या मालकाला नक्कीच निरोप देऊ, अशी सारवासारव करणारी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
उद्घाटनच वादाच्या भोवऱ्यात

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं गेलं होतं. वीकेंड लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचं पालन या ठिकाणी झालं नव्हतं. अजित पवार पक्ष कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आत गेले होते. यासंदर्भात पोलिसांना कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करायला सांगणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं, तसेच त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासोबत 150 महिला आणि पुरुष पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button