TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेला मुंबईत रोखण्याचे भाजपचे ध्येय ; अमित शहा यांच्या भेटीत रणनीती

मुंबई :  केंद्रासह १८ राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचीच, असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई भेटीत दिला आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे दुरावलेल्या शिवसेनेवर सूड उगारून राज्यासह मुंबईतही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल हे भाजपला अधोरेखित करायचे आहे  व त्यासाठी शहा यांनी राज्यातील नेत्यांना कानमंत्र दिला आहे.

शिवसेना-भाजपची युती असताना भाजप नेत्यांना ‘मातोश्री’ वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करावी लागत असे.  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले यातूनच राजकीय परिस्थिती किती बदलली आहे आणि भाजप सर्वश्रेष्ठ असल्याच्या भूमिकेत आहे, हेच अधोरेखित होत आहे. भाजप-मनसे युतीच्या राजकीय चर्चा रंगल्या असल्या तरी ही शक्यता धूसर असून छुपा ‘समझोता’ करून मनसेचा शिवसेनेविरोधात वापर केला जाण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईत १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट शहा यांनी ठेवले असले तरी भाजपसाठी हे आव्हान सोपे नाही.

काही छोटय़ा राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेल्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतील महापालिकेतील सत्ता हस्तगत करायची, हे भाजपचे स्वप्न आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ८२ तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असल्याने भाजपने ‘ पहारेकरी ’ भूमिका स्वीकारून शिवसेनेला सत्ता दिली. भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असून शहा यांनी गणेश दर्शनाच्या भेटीनिमित्ताने मुंबईत येऊन राज्यातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मतभेद सोडून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील भाजपची कामाची पद्धतच गेल्या काही वर्षांत बदलली असून प्रत्येक राज्यातील निवडणुका ताकदीने लढविल्या जातात. हैदराबाद महापालिकेची निवडणूक भाजपने सारी ताकद पणाला लावून लढविली होती. अमित शहा यांनी लक्ष घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. त्याच ताकदीने मुंबई महापालिका निवडणूकही भाजप लढविणार असून मोदी-शहा यांची बारीक नजर त्यावर राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी युतीत निवडणूक लढवूनही भाजपला धोका देऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, याचा भाजप श्रेष्ठींना प्रचंड राग असून त्याचा राजकीय सूड घेऊन शिवसेनेला भुईसपाट करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. राज्यात सत्तापालट करून त्याचा पहिला अंक पार पाडण्यात आला आणि मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दुसरा अंक सादर करण्याची तयारी भाजप करीत आहे. त्यादृष्टीने संघटना बांधणीच्या तयारीची शहा यांनी सुकाणू समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती आहे. ठाकरे यांच्या आडमुठी भूमिकेचा भाजप नेत्यांना अनेकदा त्रास झाला व अपमानास्पद वागणूकही मिळाली. आता भाजपच्या बळावर मुख्यमंत्रीपद मिळालेल्या शिंदे यांच्याकडून भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य केला जाईल. ही बदललेली राजकीय परिस्थिती भाजपला सोयीची असल्याने आणि मनसेचाही शिवसेनेविरोधात वापर करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने भाजपच मुंबई व राज्यात सर्वश्रेष्ठ आहे, हे दाखवून देता येईल, असे ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button