breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपळे सौदागरमध्ये भाजपा- राष्ट्रवादीची ‘युती’ : कट्टर प्रतिस्पर्धी नाना- बापुंचा हातात हात!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचा एकत्रित असा एक फोटो आज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही नेत्यांच्यात कमालीचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून पहायला मिळत होता. मात्र आज हे दोनही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, नेमकं काय घडलं? आणि हे दोनही दिग्गज नेते एकत्र आले तरी कसे? मात्र त्याला कारणही तसेच आहे. पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सवाचे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आज (दि.०२ मे) पान-फुलांचा कार्यक्रम ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज मंदिरात पार पडला.

गावचा उत्सव असला की, सर्वजण मतभेद विसरून एकत्र येतात. मग वेगवेगळे पक्ष असले तरी, राजकीय जोडे बाजूला ठेवून ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी हे दोघेही माजी नगरसेवक मंदीरात एकत्र आले. यावेळी काही स्थानिक युवकांनी दोघांचाही एकाच फ्रेममध्ये फोटो घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हे दोनही दिग्गज एकत्र आले अन् फोटोही काढून दिला.

मग काय काही क्षणातच नाना आणि बापू एकत्र असलेला हा फोटो पिंपळे सौदागरसह पंचक्रोशित पोहचला. अनेकांच्या फेसबुक स्टोरीवर तसेच व्हॉटस्अपच्या डिपीवर हा फोटो झळकू लागला.

वास्तविक पाहता, गेल्या काही दिवसांपासून या दोनही नेत्यांचे ‘पॅचअप’ झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र दोघांच्याही समर्थकांकडून त्याचा साफ इन्कार केला जात आहे. आता महापालिका निवडणुक तोंडावर असताना नाना आणि बापूंच्या ‘या’ फोटोमुळे भविष्यात नेमकं काय होणार? एकत्र येणार की दोघांच्यात सत्तासंघर्ष कायम राहणार याची जोरदार चर्चा पिंपळे सौदागरसह संपूर्ण शहरात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button