breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून बेछूट आरोप

  • राष्ट्रवादीचे विद्यमान पदाधिकारी बसले ‘मूग गिळून गप्प’
  • माजी आमदार विलास लांडे यांनी आरोपाचे केले खंडन  

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेची बनावट कागदपत्रे तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या भाजप नगरसेवकाणे दुटप्पी खेळी सुरु केली आहे. या नगरसेवकाच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे भोसरीत भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केली जात आहे. अजित पवारांचा होणारा अपमान पाहुन राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी मूग गिळून गप्प आहेत. माजी आमदार विलास लांडे सोडले तर राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकाऱ्याने अजित पवार यांच्यावरच्या आरोपाचे खंडन केलेले नाही. त्यामुळे दादांच्या बदनामीचे कारस्थान रचण्यामागे राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राधिकरणाच्या जागेचे बोगस कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी भोसरीतील भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भोसरीतील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. यात भाजपाची पूर्ती बदनामी होऊ लागल्याने राजेंद्र लांडगे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यावर बेछूट आरोप करायला सुरुवात केली आहे. राजेंद्र लांडगे गजाआड असले तरी त्यांच्यामागे बड्या नेत्याची टीम कार्यरत आहे. या प्रकरणाशी अजित पवारांचा कसलाही संबंध नसताना ही टीम त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट तयार करून सोशल मीडियावरून वायरल करू लागली आहे. यामध्ये अजित पवारांची मोठी बदनामी होत आहे.

भाजपकडून बदनामी होत असताना राष्ट्रवादीचे बडे नेते व पदाधिकारी यावर काहीच बोलत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकटे माजी आमदार विलास लांडे सोडले तर राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकाऱ्याने अद्याप भाजपच्या विरोधात तोंड उघडलेले नाही. राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून भागीदारीत धंदे वाढवले आहेत. पालिकेतून करोडो रुपयांची कामे घेऊन ‘खाओ और खाणे दो’चा फॉर्मुला जोपासला आहे. भाजप पदाधिका-यांसोबत मिलीभगत केल्यानंतर अजित पवारांवर होणाऱ्या आरोपांबद्दल कोणत्या तोंडाने बलणार, अशी अवस्था राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची झाली आहे. भोसरीतील एकाही नगरसेवकाने आरोपाचा प्रतिकार केला नाही. उलट आरोपाला खतपाणी घालण्याचा उद्योग एका राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीवर होणारे आरोप नागरिकांना खरे वाटू लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांमुळेच भोसरीला वैभव प्राप्त झाले 

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाची गंगा आणली. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृह, प्रथम महिलांसाठी जिम, राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, लांडेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व नवीन शिवश्रृष्टी, नवीन भोसरी रुग्णालय, आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्र, संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज समूह शिल्प, लांडेवाडी चौकातील राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार कमान, भोसरी उद्यान, स्मशानभूमी, दशक्रिया घाट, बुद्धविहार, विरंगुळा केंद्र, बॅडमिंटन हॉल, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन, सखुबाई गवळी उद्यानात रंगीत लेजर शो, गावात बॅडमिंटन हॉल, विरंगुळा केंद्र, दिघीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, दिघी पोलीस स्टेशन, दिघी येथील पाण्याची टाकी, पंचशील बुध्दविहार, संत शिरोमणी मंदिर, संत सेना महाराज मंदिर, सुवर्णकार मंदिर, वडमुखवाडी येथील कानिफनाथ मंदिर, चऱ्होली येथील स्विमिंग पूल, मैल शुद्धीकरण प्रकल्प, कुस्ती आखाडा, मुलांसाठी खेळाचे मैदान, मॅगझीन चौकातील पाण्याची टाकी, डुडुळगाव धायरकर वस्ती येथील पाण्याची टाकी, चऱ्होली- मरकळ रोड रस्ता, ताजनेमळा येथील ओढ्यावरील पूल, पठारे मळा येथील पूल, आरटीओ कार्यालय व प्रशिक्षण संकुल, मोशी स्पाइन रोड व उड्डाणपूल, ट्राफिक पार्क, भक्ती-शक्ती समूह शिल्प आदी विकासकामे अजित पवार यांनीच भोसरीच्या पट्यात केली आहेत. अशी एक नव्हे तर शेकडो कामे सांगता येतील. माजी आमदार विलास लांडे यांनीच दादांकडे पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावली आहेत.

तसेच, शासनाचे सुद्धा मोठमोठे विकास प्रकल्प राबविण्याचे काम अजित पवार यांनी केले. मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह, आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, जिल्हा न्यायालयाला जागा मिळवून देणे, असे अनेक प्रकल्प उभे करण्यात अजितदादांनी सहकार्य केले आहे. यामुळेच भोसरीतून पवार यांच्यावर झालेला आरोप लांडे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी आरोपाचे कडव्या भाषेत खंडन केले आहे. एवढेच नव्हे तर ही नौटंकी बंद करा, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वैयक्तिक पातळीवर पाहिले तर लांडे यांचे कोणाशीही वैर नाही. भोसरीतच नवे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचा विरोधक शोधून सापडणार नाही. अजित पवार यांच्यावरती जर बिनबुडाचे आरोप होत असतील तर त्यांना वाईट वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे लांडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे भोसरी मतदार संघासह पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून समर्थन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button