breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार

  • भोसरीतील शिक्षक मेळाव्यात आमदार लांडगे यांचे आश्वासन
  • हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचाही दिला शब्द

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी शहराचे उद्याचे भवितव्य आहेत. त्यांना नाविन्यपुर्ण, स्मार्ट शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत. लवकरच शिक्षकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली जाईल. तसेच, हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी शहरातील शिक्षकांना दिला.

भोसरी मतदार संघातील शिक्षकांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी महेशदादा स्पोर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने रविवारी (दि.14) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शिक्षक मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक व लोकगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. शाहीर बाळासाहेब काळजे यांचा ‘ही दौलत महाराष्ट्राची’ यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. आमदार लांडगे यांनी शिक्षकांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, ‘इ’ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, सागर गवळी, पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी कुराडे, पी. डी. पाटील यांच्यासह भोसरी मतदार संघातील महापालिका, खासगी शाळांचे चालक, शिक्षक कर्मचारी मेळाव्याला उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी शिक्षकांच्या समस्या, त्यांना येणा-या अडी-अडचणी जाणून घेतल्या. महापालिका शाळेच्या योजना खासगी शाळांना चालू कराव्यात. शालेय पोषण आहार व साहित्य पुरवावे. पेन्शन योजना चालू करावी, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न मार्गी लावावा. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात यावे. शिक्षकांसाठी धन्वंतरी योजना चालू करावी. शिक्षकांची पिंपरी-चिंचवड संघटना स्थापन करावी. टीईटी रद्द करण्यात यावी. विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांना 20 टक्के अनुदान मिळावे. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचा प्रश्न मार्गी लावावा. शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. विनाअनुदानित शाळा घोषित करण्यात याव्यात. मुंबई महापालिकेने विनाअनुदानित शाळांच्या वेतनाची जबाबदारी घेतली असून त्याच धर्तीवर पिंपरी महापालिकेने कार्यवाही करावी. शिक्षण विभागाच्या कार्यालयातील अनागोंधी कारभारात सुधारणा करण्यात यावी, अशा विविध मागण्या शिक्षकांनी केल्या.

आमदार लांडगे म्हणाले की, ‘शिक्षकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण देण्यात यावे. महापालिका शाळांना सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात देत आहे. त्यामध्ये आणखीन वाढ केली जाईल. परंतु, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत. आगामी काळात शिक्षकांसाठी देखील प्रशिक्षण घेण्यात येईल. त्याचबरोबर शिक्षकांच्या समस्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली जाईल’.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीष चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले. तर पोपट नाईकनवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लालासाहेब जगदाळे, हनुमंत आगे, मनोज मराठे, गोरक्ष दंडवते यांचे मोठे योगदान लाभले. भोसरीतील श्रीराम विद्याम मंदिर शाळा व मुख्याध्यापक जगदाळे, लाल बहादूर शास्त्री विद्यालय आणि टागोर विद्यालय इंद्रायणी व त्यांचे मुख्याध्यापक आगे, काळे यांनी विशेष सहकार्य केले.

आदर्श शाळा, गुणवंत शिक्षकांचा यावेळी आमदार लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘भोजापूर भूषण पुरस्कारा’ने अशोक देशमाने, राजकुमार पाटील, दत्ता इंगळे, रोहिणी गव्हाणे, मुबीन तांबोळी, दिंगबर ढोकले, मंगल आहेर, महेंद्र माने, भारत डोळस यांच्या गौरव करण्यात आला. राहूल ताकमोडे, विनोद वाळके, रणवीर सुर्यवंशी यांचा क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर 48 गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच भोसरीतील 15 शाळांचा आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button